नीलगाईने घेतले दोघांचे बळी! वन्य प्राण्यांचा उपद्रव, चक्क टिप्पर झाला पलटी ! मोताळा तालुक्यातील मध्यरात्रीची घटना

नववर्षी उजाडले ते अपघातांची मालिका घेऊनच! रस्ते अपघात रोखण्यासाठी जिल्हा यंत्रणा जागर करीत आहे. परंतु अपघात काही थांबत नाही. काल मध्यरात्री समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स पलटी होऊन ३० प्रवासी जखमी झाले. एकाचा ट्रकने चिरडल्याने मृत्यू देखील झाला. अशात, मोताळा तालुक्यातील वडगाव मार्गावर देखील अपघात होऊन दोघांना मृत्यूने कवेत घेतले. मोताळ्यातील शिवसेना शिंदे गटाचे नेते शरद पाटील यांचे पुत्र प्रवीण पाटील यांच्या मालकीचा वाळू वाहतूक करणारा टिप्पर (एम बी १ जी.डब्ल्यू. जी सी डी ८ एन आर पी इ ४३४४) मजुरांना घेऊन जात होता.
दरम्यान मोताळा वडगाव रोडवर चांदखेड नाल्याच्या समोर नीलगाय आडवी आल्याने भीषण अपघात झाला. टीप्पर चालक किरण अरुण इंगळे रा. सारोळा मारुती वळविण्याचा प्रयत्न केला असता, स्टेरिंग वरील नियंत्रण सुटल्याने टिप्पर पलटी झाले. याबद्दल संजय देवसिंग हिवाळे, किशोर शांताराम हिवाळे, प्रमोद विठ्ठल हिवाळे, शांताराम प्रभाकर हिवाळे आणि ट्रक चालक किरण इंगळे असे ५ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी ट्रक चालक किरण इंगळे विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.