बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर गतिरोध गरजेचे! सुसाट वाहने ठरताय अपघाताचे कारण
Sat, 7 May 2022

बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा शहरातील चिखली रोडवर असलेल्या बुलडाणा शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर गतिरोधक बसविण्याची मागणी जोर धरत आहे. गेल्या काही दिवसांत अनेक छोटे मोठे अपघात या ठिकाणी झालेले असल्याने मोठी दुर्घटना टाळायची असल्यास गतिरोधक गरजेचेच आहे.
बुलडाणा शहरातून चिखली रोडकडे अनेक वाहने भरधाव वेगाने येतात. त्यामुळे पोलीस ठाण्यात जायचे असल्यास किंवा पोलीस ठाण्यातून बाहेर पडत असतांना अतिशय कसरत करून गाडी चालवावी लागते. बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यासमोरच एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा अपघात काही दिवसापूर्वी झाला होता. याशिवाय छोटे मोठे अपघात नित्याचीच बाब झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर त्याठिकाणी गतिरोधक बसवावे अशी मागणी पोलीस कर्मचाऱ्यांमधून समोर येत आहे.