नमाज पठणासाठी गेलेल्या "त्या" तरुणाचा खून अनैतिक संबंधातून!; बायकोशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून जिगरी दोस्ताच्या पोटात खुपसला चाकू; संग्रामपूर तालुक्यातील घटना

 
ghj
संग्रामपूर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नमाज पठणासाठी गेलेल्या तरुणाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना आज, ३ मे रोजी सकाळी संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथील ईदगाह परिसरात घडली होती. मुस्लिम समाजातील दोन गटात झालेल्या या वादात शेख रफिक शेख गणी (२७)  या तरुणाचा मृत्यू झाला होता. दरम्यान हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मृतक शेख रफिकचे त्याचा एकेकाळचा जवळचा मित्र सय्यद जुबेरच्या  पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय सय्यद जुबेरला होता. त्या संशयातून  त्याने रफिकचा खून केल्याचे समोर आले आहे.

 मोताळा पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी सय्यद जुबेर(३०)  व सय्यद रहेमत यांना अटक केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक रफिक आणि आरोपी सय्यद जुबेर एकेकाळी जिगरी दोस्त होते. दोघांचे घरही समोरासमोर होते. दरम्यान रफिक चे सय्यद जुबेरच्या  पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय सय्यद जुबेर ला येत होता .

याच कारणाने त्याने त्याच्या पत्नीला तलाक दिला होता. एकेकाळचे जिवलग दोस्त असलेले रफिक आणि सय्यद जुबेर यांच्यात या कारणावरून आधीच वाद झालेले होते. या वादामुळे मृतक रफिक हा गाव सोडून गेला होता. मात्र ईदच्या निमित्ताने तो गावी आला होता. जुना राग मनात ठेवून सय्यद जुबेर आणि सय्यद रहेमतने रफिकचा खून केला. याप्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष ठेवून आहेत.