चिखलीच्या "गणेश" ने केला स्टेट बँक मॅनेजरचा खून! रक्ताने माखलेले कपडे फेकून द्यायला बायकोनेही केली मदत; खुनाचे कारण धक्कादायक !

नवनियुक्त एलसीबी प्रमुख अशोक लांडेंच्या पथकाने दाखवून दिलं,कानुन के हाथ लंबे होते है! 

 
patil

बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर लोणार रस्त्यावरील सारंगपूर फाट्याजवळ असलेल्या उसाच्या शेतात उत्कर्ष पाटील (३६, रा .मुंबई)  यांचा मृतदेह १ जानेवारीच्या संध्याकाळी मिळून आल्याने खळबळ उडाली होती. उत्कर्ष पाटील हे गेल्या काही दिवसांपासून हिरडव येथील स्टेट बँकेत मॅनेजर म्हणून काम पाहत होते. दरम्यान मृतदेहाशेजारी धारधार चाकुही मिळून आला होता. अखेर या खुनाचा छडा लावण्यात एलसीबी टीमला यश मिळाले असून खुनाचे चिखली कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. आठवडाभरापूर्वी एलसिबीचा कारभार स्वीकारणारे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांनी व त्यांच्या पथकाने या क्लिष्ट गुन्ह्याची उकल केली आहे.

 ४ महिन्यांपूर्वी बदली होऊन उत्कर्ष पाटील बुलडाणा जिल्ह्यात आले होते. जिथे शाखा व्यवस्थापक सुट्टीवर असेल तिथे  पाटील यांना डेप्युटेशन वर पाठविल्या जात होते. शेवटच्या १५ दिवसांत ते हिरडव शाखेचा कारभार पाहत होते. त्यांचा परिवार मुंबईत असल्याने ते लॉज वर थांबायचे. दरम्यान स्वभावाने अतिशय शांत, कमी बोलणारे उत्कर्ष पाटील हे जिल्ह्यात येऊन अतिशय कमी दिवस झाल्याने त्यांची परिसरात ओळख कमी होती. त्यामुळे त्यांचा खून कोण आणि कोणत्या कारणासाठी करेल असा प्रश्न पडला होता.

   पैशासाठी झाला गेम...!!

उत्कर्ष पाटील हे मेहकर शहरातील एका लॉज वर थांबायचे. त्या लॉजवर  चिखलीचा गणेश देशमाने मॅनेजर म्हणून काम करायचा. तिथे गणेश देशमाने याच्याशी त्यांचा परिचय झाला. लॉज वरील इतर ग्राहक बाहेर जातांना चावी लॉज च्या काऊंटर वर ठेवायचे मात्र उत्कर्ष पाटील चावी सोबत घेऊन जायचे, त्यामुळे उत्कर्ष पाटील यांच्याकडे जास्त पैसा असेल असे गणेश देशमाने याला वाटत होते. त्यामुळे उत्कर्ष पाटील यांचा गेम करायचा असे गणेशने मनोमन ठरवले होते. दरम्यान पगार परवडत नसल्याचे कारण पुढे करून  घटनेच्या ८ दिवस आधी गणेश ने लॉज वरील नोकरी सोडली होती. मात्र तरीही फोनवरून तो गोड गोड बोलून उत्कर्ष पाटील यांच्या संपर्कात होता. ३१ डिसेंबरला मेहकर शहरातील एका वाईन शॉप वरून दारू सोबत घेत गणेश ने उत्कर्ष पाटील याने सारंगपुर भागात नेले आणि तिथेच धारधार शस्त्राने त्याने पाटील यांचा खून केला. मृतदेह शेतातील नाल्यात फेकून त्यावर गाजर गवत टाकून दिले.

    पुरावे मागे सोडले..!

पोलिसांनी घटनास्थळी दोन मोबाईल सापडले. त्यापैकी एक गणेश देशमाने तर दुसरा उत्कर्ष पाटील यांचा होता. दरम्यान उत्कर्ष पाटील यांचा खून झाल्यानंतरही त्यांच्या एटीएम कार्डच्या माध्यमातून २ वेळा पैसे विड्रॉल झाल्याचे समोर आले. या माहितीनंतर पोलिसांनी उत्कर्ष पाटील राहत असलेल्या लॉज व ते जेवायला जात असलेल्या ठिकाणी कसून चौकशी केली.
   
गणेशच्या पत्नीची चौकशी..!

  पोलिसांनी गणेशच्या पत्नीची चौकशी केली. आधी उत्तरे द्यायला टाळाटाळ करणारी गणेशची पत्नी पोलिसांनी विश्वासात घेतल्यानंतर बोलू लागले.  उत्कर्ष पाटील यांचा खून केल्यानंतर गणेश मेहकर शहरातील बालाजी नगरात असणाऱ्या त्याच्या भाड्याच्या घरी आला. घरी कपडे बदलल्यानंतर रक्ताने माखलेले कपडे फेकण्यासाठी त्याची पत्नीही त्याच्या सोबत गेली. डोणगाव रस्त्यावरील क्रीडा संकुल जवळ कपडे फेकल्याचे तिने पोलिसांना सांगितले. दरम्यान पोलिसांनी ते कपडे ताब्यात घेतले आहेत.

गणेश फरार झाला...

 दरम्यान खून करून पसार झालेला गणेश पसार झाला होता. नुकतेच एलसीबीची धुरा हाती घेतलेले अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनात पथक गणेशच्या मागावर होते. दरम्यान ४ जानेवारीच्या संध्याकाळी त्याला डोंबिवली भागातून ताब्यात घेण्यात आल्याचे एलसीबी प्रमुख अशोक लांडे यांनी बुलडाणा लाइव्ह शी बोलताना सांगितले.  आज ५ जानेवारीच्या पहाटे पोलिसांचे पथक आरोपी गणेश देशमाने याला घेऊन मेहकरात दाखल झाले आहे. त्याच्या चौकशीतून या प्रकरणातील आणखी वेगळे कंगोरे समोर येण्याची शक्यता आहे.
    
प्रेमविवाह करणारा गणेश मेहकरात राहत होता...

   दरम्यान आरोपी गणेश देशमाने याने दीड वर्षाआधी प्रेमविवाह केला होता. आंतरजातीय प्रेमविवाह केल्यानंतर तो आई वडील व पत्नीसह मेहकर येथे राहत होता व एका लॉज वर काम करीत होता. गणेशच्या पत्नीने रक्ताने माखलेले कपडे फेकून द्यायला मदत करीत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याने तिच्या विरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तपासादरम्यान चिखलीत गणेशच्या मोठ्या भावाच्या घरी देखील चौकशी केल्याचे कळते.