"पैसा बोलता है!' मावळत्या वर्षात १२ लालची गळाला! महसूल विभाग व जिल्हा परिषद लाचखोरीत अव्वल! उपजिल्हाधिकारी घुगेही निघाला खादाड..

कागदावर ‘वजन’ ठेवल्याशिवाय कागद पुढे सरकत नाही, असे नागरिकांतून उघडपणे बोलले जाते. महसूल कार्यालयातील लाचखोरी काही थांबायचे नाव घेत नसून येथे व जिल्हा परिषदमध्ये प्रत्येकी २ लाचखोरीची प्रकरणे उघडकीस आल्याने नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याप्रकरणी एसीबी( लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) कारवाई करीत आहे. कर्मचाऱ्यांपेक्षा क्लास वन क्लास टू चे अधिकारी पैशासाठी हापापले दिसतात. नुकतीच एसीबीने वर्षाअखेरीस मोठी कारवाई करीत एकाच वेळी तिघा लाचखोरांना जाळ्यात अडकवले. या कारवाईमुळे जिल्हाधिकारी कार्यालय, विधिक्षेत्रासह जिल्ह्याचे प्रशासकीय वर्तुळ चांगलेच हादरले. लाचखोरांमध्ये स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादनचे (मध्यम प्रकल्प) उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे, लिपिक नागेश खरात आणि मध्यस्थी करणारा वकील अनंता देशमुख यांचा समावेश आहे.लाचखोरीचे व्यसन जडलेल्या घुगे यांना ‘एसीबी’च्या कारवाईला सामोरे जाणे नवीन नाही.८ वर्षांपूर्वी त्याला मराठवाड्यात कार्यरत असताना असेच पकडण्यात आले होते. त्यावेळी लाचेची रक्कम १२ हजार रुपये होती. उस्मानाबाद येथे जिल्हा पुरवठा अधिकारी पदावर कार्यरत असताना त्याच्या मार्फत अधीनस्थ लिपिकाला १२ हजाराची लाच घेताना पकडण्यात आले होते. परंतु अनेकवेळा कारवाई होऊनही येथील लाचखोरीची कीड कायमची नष्ट होत नसल्याचे बोलले जात आहे.
महसूल व जिल्हा परिषद लाचखोरीत टॉपवर!
विधी व न्याय विभाग १, भूमी अभिलेख विभाग १, वनविभाग १, शिक्षण विभाग १ तर जिल्हा परिषद विभाग २, महसूल विभाग २ अशा ८ कारवाया मावळत्या वर्षात करण्यात आल्या. यामध्ये क्लास वनचा १, क्लास टूचा १, आणि क्लास थ्रीच्या ६ जणांचा समावेश आहे. तसेच ४ खाजगी व्यक्तींवर सुद्धा लाचखोरीची कारवाई करण्यात आली. ही कारवाई एसीबीचे डीवायएसपी संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.