मेहकरच्या लेकीला नवऱ्याने प्रचंड छळले! नवऱ्याच्या "त्या लोभापाई" अडीच महिन्यात संसाराचा खेळखंडोंबा! वाचून तुम्ही म्हणाल, देवा असा नवरा कुणालाच नको देऊ

 
chaL
मेहकर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बिचारीला वडील नाहीत. आईने, चुलत्याने, मामाने सर्वांनी मिळून वर्षभरापूर्वी धुमधडाक्यात तिचे लग्न लाऊन दिले. तीन लाख हुंडा, तीन तोळे सोने, कपाट,फ्रिज, कूलर, एलइडी टिव्ही, वॉशिंग मशीन, सोफासेट सगळ काही दिलं. सुखी संसाराची स्वप्ने रंगवून ती सासरी गेली मात्र अवघ्या ८ दिवसांत तिला तिच्या नवऱ्याचे खरे रूप कळले. लग्नात बक्कळ हुंडा मिळूनही त्याची भूक भागली नाही. २० लाख रुपयांची मागणी त्याने तिच्याकडे केली अन् त्या पैशाच्या लोभापायी अडीच महिन्यांतच संसाराचा खेळखंडोबा झाला.  बिचारीने आता मेहकर पोलीस ठाण्यात धाव घेत नवऱ्याच्या कारनाम्याचा पाढा वाचला. पोलिसांनी आता तिच्या नवऱ्यासह सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.

 निकिता उर्फ दीप्ती पुंडलिक गवई (३०) ही सध्या माहेरी मेहकर येथे आली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात २७ तारखेला अकोल्याच्या तापडिया नगरात राहणाऱ्या पुंडलिक गवई याच्याशी तिचे लग्न झाले होते. लग्नात हुंडा, सोने, आंधन सगळ काही मिळूनही तिच्या नवऱ्याची आणि सासरच्यांची भूक भागली नाही. लग्नानंतर आठ दिवसांतच माहेर वरून २० लाख रुपये घेऊन ये असा तगादा तिच्या मागे लावण्यात आला. मला वडील नाहीत, कर्ज काढून चुलत्याने, मामाने लग्न लाऊन दिल्याचे तिने सांगितले मात्र तरीही  नवऱ्याला आणि सासू सासऱ्याला दया आली नाही. तू हिला मारहाण कर, तिची पिळवणूक कर असे तिच्या सासूने तिच्या नवऱ्याला सांगितले आणि तिची छळकहाणी सुरू झाली.

नवरा ,सासू , सासरे तिला उपाशीपोटी ठेवत असल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. सासरी जे घडतय ते ती तिच्या आईला सांगण्याचा प्रयत्न करीत होती मात्र तिच्या आईशी तिला बोलू देत नसल्याचे देखील तक्रारीत म्हटले आहे. तिच्या माहेरच्या लोकांनी सासरच्यांची खूप समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र काहीएक फरक पडला नाही.

तू तुझ्या माहेरच्यांना काही सांगितले तर  तुम्हाला बरबाद करू, तुम्हाला कुठलेही ठेवणार नाही असे म्हणत तिच्या नवऱ्याने तिला बेदम मारहाण केली आणि ११ मार्च २०२२ रोजी घराबाहेर हाकलून लावले. तेव्हापासून ती माहेरी राहते. काल, तिने पोलीस ठाण्यात धाव घेत नवऱ्याची व सासरच्या लोकांची तक्रार दिली. पोलिसांनी निकिताच्या नवऱ्यासह सासू सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.