लग्नानंतर तीनच महिन्यांत विवाहितेची आत्महत्या! सिव्हील इंजिनिअर नवऱ्याला होती सोन्याची हाव! चिखलीच्या संभाजीनगरातील घटना

जाहिरात
पुजा अक्षय गायकवाड(१९, रा.संभाजीनगर) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे. पुजाचे वडील प्रकाश गणपतराव सोळंकी (६०, रा. कुंभारझरी ता. जाफ्राबाद) यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पुजाचे लग्न १८ जून २०२२ रोजी चिखली शहरातील संभाजीनगरात राहणाऱ्या अक्षय जनार्दन गायकवाड याच्याशी झाले होते. लग्नात त्यांच्या मागणीनुसार ५ तोळे सोने देण्यात आले होते.
मात्र लग्नानंतर सिव्हील इंजिनियर असलेला पुजाचा नवरा तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता. तुझ्या बापाने लग्नात सोने कमी दिले असे टोमणे तिला मारण्यात येत होते. आमच्याकडे खूप पैसा आहे, तुझ्या जेवणात पॉइझन टाकून मारून टाकीन असे सासू तिला म्हणत असल्याचे पुजाच्या माहेरकडील मंडळींनी बुलडाणा लाइव्हला सांगितले.
यावरून तिच्या घरी वाद झाला होता. तिने फोनवरून याबाबत माहेरच्यांना कळवले होते. त्यामुळे माहेरचे लोक वाद मिटविण्यासाठी आज, २० सप्टेंबरला चिखलीला येणारच होते. मात्र त्यापूर्वीच पुजाने राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे याबाबत पुजाच्या सासरकडील मंडळींनी आपल्याला काहीएक कळवले नसल्याचा आरोप पुजाच्या माहेरच्यांनी केला आहे. पोलिसांनी याबाबत पूजाच्या आईवडिलांना कळवले. मात्र पुजाचे आईवडील घटनास्थळी पोहचण्याआधी पूजाचा मृतदेह फासावरून उतरवण्यात आला. पुजाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पुजाचा नवरा अक्षय जनार्दन गायकवाड, सासू अनिता जनार्दन गायकवाड, सासरा जनार्दन रामराव गायकवाड, दिर प्रशांत जनार्दन गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.