प्रेमविवाह केलेल्या गरोदर मुलीचे माहेरच्यांनीच तोंड दाबून केले अपहरण; जावयाला सैराट करण्याची धमकी! पती पोलिसांना हात जोडून थकला!

 २५ दिवस झाले पोलीसांनी साधा गुन्हाही दाखल केला नाही! नांदुरा तालुक्यातील खळबळजनक घटना
 
nandura
नांदुरा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम..मात्र या प्रेमाला तिच्या घरच्यांचा विरोध होता.. अखेर घरच्यांना डावलून तिने पळून जावून लग्न करण्याचा निर्णय घेतला अन् प्रेमविवाह केला. ती त्याच्यासोबत अतिशय सुखात राहू लागली. काही महिन्यांत त्यांच्या संसारात नव्या पाहुण्याचे आगमन होणार होते. मात्र लेकीच्या सुखाच्या संसाराला तिच्या माहेरच्या लोकांचीच नजर लागली. तिच्या आईवडिलांनी गुंडांना हाताशी धरून तिच्या घरात घुसून तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्ती तिला क्रुझरमध्ये घेऊन गेले.ते कायमचेच.. ही घटना घडली नांदुरा तालुक्यातील मोमिनाबाद येथे १० एप्रिलच्या रात्री..आपल्या डोळ्यादेखत गरोदर पत्नीचे गुंडांनी अपहरण केल्याची तक्रार त्याच रात्री त्याने पोलीस ठाण्यात दिली..दुसऱ्या दिवशी जिल्हा पोलीस अधीक्षकांना तक्रार दिली..पण पोलीसांनी साधा गुन्हाही दाखल केला नाही.. एका दिवशी त्याच्या पत्नीने एका दुसऱ्या मोबाईलवरून त्याला मॅसेज केला..ह्या लोकांनी मला भुसावळला आणल्याचे तिने सांगितले..हे लोक मला मारून टाकतील तुम्ही पोलीसांना कळवा असे तिने मॅसेजद्वारे पतीला सांगितले. तो पुन्हा हात जोडत पोलीस ठाण्यात गेला..पुन्हा तक्रार दिली..मात्र पोलीसांवर तक्रारीचा कोणताही परिणाम झाला नाही..घटना घडून २५ दिवस झालेत बायको कुठेय हे त्यालाही माहीत नाही अन् पोलीसही मदत करायला तयार नाहीत.. अखेर आज, ५ मे रोजी या हवालदील झालेल्या पतीने बुलडाणा लाइव्ह ला आपबिती सांगितली..

नांदुरा तालुक्यातील मोमिनाबाद येथील मोहन गजानन शेंडगे(३१) याचे खामगाव शहरातील गुंताबाई नगर , घाटपुरी परिसरात राहत असलेल्या नात्यातीलच २० वर्षीय मुलीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र तिच्या घरच्यांच्या या लग्नाला विरोध होता. त्यामुळे दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. ७ डिसेंबर २०२१ रोजी त्यांनी भोपाळ येथे पळून जात नोंदणी विवाह केला. त्यानंतर मोहन पत्नीला घेऊन घरी मोमिनाबाद येथे राहू लागला. दरम्यान ती गरोदर राहिली..इकडे मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने तिचे आईवडिल संतप्त झाले होते. मुलीच्या वडिलांनी तीन वेळेस मोमिनाबाद येथे येऊन मुलीला घरी चलायला सांगितले..हे लग्न मंजूर नाही, आपल्याला फारकती  पाहिजे असे मुलीचे वडील मुलीला म्हणत  होते. मात्र मुलीचे मोहणवर प्रेम असल्याने व त्याच्या बाळाची ती आई होणार असल्याने तिने या गोष्टीला नकार दिला होता. दरम्यान , १० एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजता मुलीचे वडील, आई व इतर आठ ते १० जण क्रुझर घेऊन मोमिनाबादला आले. त्यांनी मोहनच्या घरात धिंगाणा घातला..मुलीचे तोंड दाबून तिला क्रूझरमध्ये टाकले..मोहनला तुझा सैराट करून टाकील अशी धमकी दिली..आणि तिथून निघून गेले..


  अचानक घडलेल्या या प्रकारामुळे  मोहनने त्याच रात्री नांदुरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चांदुरबिस्वा पोलीस चौकीत तक्रार दिली..मात्र पोलीसांनी गुन्हा दाखल केला नाही. दुसऱ्या दिवशी मोहनने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला मदतीसाठी याचना केली..दरम्यान १७ एप्रिलला मोहनला एका अनोळखी नंबरवरून मॅसेज आला..त्यात तीने मोहनची पत्नी असल्याचे सांगितले .."हे लोक मला भुसावळला घेऊन आले आहे..मला इथे रहायचे नाही, हे येऊ देत नाही..तुम्ही पोलिसांना सांगा " असे तिने सांगितल्याचे मोहनने तक्रारीत म्हटले आहे.


    त्या नंतर २२ एप्रिलला मोहनने पुन्हा नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली..मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही..दरम्यान पोलीस मोहनला घेऊन खामगावला गेले. त्याला घाटपुरी चौकात उतरवले..पोलीस मुलीच्या घरी गेले..एका तासानंतर पोलीस परतले तेव्हा मुलगी घरी नसल्याचे पोलीसांनी मोहनला सांगितले..मुलगी परतल्यानंतर पाहू असे म्हणत पोलीस निघून गेल्याचे मोहनने बुलडाणा लाइव्हला सांगितले.. मोहनने त्यानंतर अनेकदा पोलीसांकडे पुन्हा पुन्हा मदतीची याचना केली..मात्र मोहनच्या तक्रारीवरून पोलीसांनी साधा गुन्हाही दाखल केला नाही.. बायको कुठे असेल, कशी असेल या विवचंनेत असलेल्या मोहनला न्याय मिळण्याची अपेक्षा आहे.....