दारू वाहतूक करणाऱ्यांची उतरवली नशा!एलसीबीकडून ४ लाख ७३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत! दोन आरोपींना अटक

 
Tguu
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ड्राय डे चा मुद्दा बुलडाणा लाईव्हने २६ जानेवारीला उचलून धरला होता. अवैध दारू वाहतूक आणि अवैध दारू विक्री सुरू असल्याचे वास्तव मांडण्यात आले होते. दरम्यान २७ जानेवारीला एलसीबीने तब्बल ४ लाख ७३ हजार ५०० रुपयांच्या दारूसह वाहन जप्त केले आहे.ही कारवाई साखरखेर्डा हद्दीत एलसीबी प्रमुख अशोक लांडे यांचे नेतृत्वात पथकाने केली. पवन सुभाष अवसरे, सुरेश जगन्नाथ सवडतकर दोघेही रा. अमडापूर ता.चिखली असे आरोपींचे नाव आहे.

प्रजासत्ताक दिनाला चिखली येथे ठाणेदार विलास पाटील यांच्या नेतृत्वात अवैध दारू विक्रेत्यांवर रेड टाकून दारूच्या बाटल्यांचा १२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आता होता.२५ जानेवारीला देखील चिखली येथे दारू जप्तीची कारवाई झाली. या संदर्भात बुलडाणा लाईव्हने 'ड्राय डे कशाला म्हणतात रे भावा' या मथळ्याखाली वास्तविकता अधोरेखित केली आहे. दरम्यान पोलीस यंत्रणा आता गुटखा आणि दारू कारवाईवर करडी नजर ठेवून आहे. अवैध दारू विक्रीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची काही हालचाल दिसून येत नाही.गेल्या वर्षात राज्य उत्पादन शुल्क विभागाने ९ महिन्यात ९९९ ठिकाणी छापा मारून ९० वाहने जप्त करीत १ कोटी ५३ लाख १५ हजार १७१ रुपयांचा मुद्देमाल  जप्त केला तर ७० ठिकाणी बेवारस सापडलेल्या दारू साठ्यावर कारवाई केल्याची आकडेवारी आहे.

विशेष म्हणजे एप्रिल ते डिसेंबर २०२२ या ९ महिन्यांच्या काळात ९७३ जणांना अटक करण्यात आली. एकूण कारवाई पैकी ७० बेवारस गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु अवैध दारू जप्तीच्या कारवाईत आता पोलीस अधिक सक्रिय दिसून येत आहेत.२७ जानेवारीला एम एच २८ बीके ६६२१ क्रमांकाच्या मारुती सुझुकी मध्ये विनापरवाना दारू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्याने एलसीबी पथकाने रेड केली.पवन सुभाष अवसरे, सुरेश जगन्नाथ सवडतकर या आरोपींकडून देशी दारूचे २१ बॉक्स, मारुती सुझुकी वाहन मिळून ४ लाख ७३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सचिन कानडे, गजानन दराडे, युवराज राठोड, राजकुमार राजपूत यांनी केली. अवैध दारू वरील कारवाईचे सत्र असेच सुरू रहावे, अशी अपेक्षा खास करून महिला वर्गांकडून होत आहे.