तंबाखू शौकिनांच्या खिशाला चुना! कारवाईच्या धसक्याने गुटख्याची बेभाव विक्री

 
ghutka
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू या मादक पदार्थांवर एलसीबीने कारवाईचा धडाका लावताच, पानटपऱ्याधारकांचे धाबे दणाणले. जिल्हायंत्रणेने सुद्धा यापूर्वी पानटपऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली.परिणामी चोरीछुपे होणारी बेभाव गुटखा विक्री तंबाखू शौकिनांच्या खिशाला चुना लावणारी ठरत आहे.

जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात तंबाखू मिश्रित सुपारीचा घोटा खाण्याचे प्रमाण आहे. तंबाखू, गुटखा खाण्यासाठी लहानापासून वयोवृद्ध आणि महिलां सुद्धा शौकीन आहेत. त्यामुळे गल्लीबोळात हे मादक पदार्थ खुलेआम विक्री होत आहे. दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. एचपी तूम्मोड यांनी तत्पूर्वीच राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण बैठकीत तंबाखू मुक्तीचा जागर करण्यासाठी संबंधितांना सूचना दिल्यात. दरम्यान जिल्हा अंमलबजावणी पथकाने पानटपरीधारकांवर व नागरिकांवर कारवाई करून १४ हजार ९७० रुपयांची दंडात्मक कारवाई केली.

मात्र शहरात व ग्रामीण भागात तंबाखूचा घोटा घोटणाऱ्या मशीन पोलिसांच्या डोळ्यासमोर दिसूनही कारवाई होत नाही. तर बुलडाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख अशोक लांडे यांनी गुटखा विक्री व साठवणूक करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका लावला. काही ठिकाणी धाड टाकून गुटखा जप्त करीत आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईचा धसका घेत गुटखा माफिया सध्या गायब झाले आहेत. काही ठिकाणी पानटपऱ्यांवर गुटखा मिळेनासा झाला. परंतु अनेक पानटप्प्यांवर चोरीछुपे आताही गुटखा दरवाढ करून विकल्या जात आहे.२५ रुपयांची मोठी विमल गुटखा पुडी ३० रुपयांना दिली जाते. ५ रुपयाची मिळणारी नजर ७ ते ८ रुपयांना विकली जात आहे. त्यामुळे वाढीव झळ गुटखा शौकिनांना बसत असल्याने त्यांची पंचाईत झाली आहे.