कुछ तो गडबड हैं; मलकापूरच्या "त्या" प्रकरणात बलात्काऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न? अर्भक जमिनीत गाडणाऱ्या पीडित मुलीचा भाऊ अन् बाप तोंड उघडेना..! आता अर्भकासह पीडितेची होणार डीएनए टेस्ट..!

पाप कुणाचे ? डीएनएन टेस्ट नंतर येणार समोर

 
malkapur

मलकापूर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): १७ वर्षीय मुलीला रस्त्यात अडवून तिच्यावर दोघांनी बलात्कार केल्याची घटना मलकापूर तालुक्यातील माकनेर शिवारात घडली होती. घरच्यांनी बदनामीच्या भीतीपोटी प्रकरण दाबल्यानंतर पीडित मुलगी प्रेग्नेंट राहिली. २६ नोव्हेंबरला तिने अर्भकाला जन्म दिला,ते अर्भक जमिनीत पुरण्यात आले. दरम्यान याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांसह भावाला मलकापूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. मात्र पोलीस चौकशीत मुलीचे वडील आणि भाऊ तोंड उघडायला तयार नसल्याची माहिती मिळत असून अत्याचारी कोण ? असा मोठा प्रश्न पोलिसांसमोर आहे. या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी पोलिस आता पीडित मुलगी ,अर्भक आणि संशयितांची डीएनए टेस्ट करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

 मलकापूर तालुक्यातील माकनेर येथे घडलेला हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पिडीत मुलीच्या कुटुंबीयांनी बदनामीच्या भीतीपोटी प्रकरण दाबण्याचा केलेला प्रयत्न त्यांच्या अंगलट आला आहे. बलात्कार प्रकरणानंतर मुलगी गर्भवती राहिली, त्यातून आणखी बदनामी होईल म्हणून अर्भक जमिनीत पुरले. अज्ञात व्यक्तीने या प्रकरणाची तक्रार चाईल्ड वेलफेअर ट्रस्ट कडे केली. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडीस आला. पोलिसांनी पुरलेले अर्भक पुन्हा जमिनीतून उकरले आहे.  दरम्यान पीडित मुलीने तिच्यावर बलात्कार करणाऱ्यांना ती ओळखत नसल्याने सांगितले आहे. त्यामुळे पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्ती विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. याशिवाय पीडित मुलीच्या वडील आणि भावाने ते अर्भक जमिनीत गाडल्याची माहिती समोर आल्याने तिच्या वडिलांना व भावाला सुद्धा  पोलिसांनी अटक केली. 
    
आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न..!

दरम्यान मुलीवर अत्याचार करणारे ते दोघे कोण? याबाबतची माहिती समोर आली नसली तरी गावात वेगळीच कुजबुज आहे. त्यामुळे बलात्कार करणाऱ्या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न पीडित मुलगी व पीडितेच्या कुटुंबियांकडून होत नाही ना असाही संशय व्यक्त करण्यात येत आहे. अत्याचार करणारे धनधांडगे असावेत, पैशाचे आमिष दाखविल्यामुळे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का यादृष्टीने सुद्धा पोलीस तपास करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे काही संशयीतांची ,पीडित मुलीची आणि अर्भकाची डीएनए टेस्ट केल्यानंतर सत्य समोर येईल.