नुसता थरार.! तवेरा चालकाला चोट्टयांनी चहा पाजला, तो बेशुद्ध झाला, शुद्धीवर आला तेव्हा हात पाय बांधलेल्या अवस्थेत मध्यप्रदेशात होता; गाडी अन् पैसेही गायब!

 अशक्य वाटणारा तपास एलसीबीने कसा केला पूर्ण वाचा थरारक स्टोरी..!

 
tyft
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): तुमची गाडी भाड्याने पाहिजे असे सांगून गाडी चालकाला चहा पाजून बेशुद्ध करीत चार चाकी लंपास केल्याची घटना २१ ऑक्टोबरला घडली होती. गाडीचालक  मंगेश हिवाळे यांनी शेगाव शहर पोलीस ठाण्यात प्रकरणाची तक्रार दिली होती. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जबरी चोरी करणाऱ्या चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून त्यांनी चोरलेली कार जप्त केली आहे.

याबाबत प्राप्त माहिती अशी की मंगेश हिवाळे हे तवेरा गाडीवर चालक म्हणून काम करतात. २१ ऑक्टोबरला हिवाळे यांच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला, त्याने तुमची गाडी भाड्याने पाहिजे असे सांगितले. त्यामुळे हिवाळे गाडी घेऊन गेले असता अज्ञात चार लोक गाडीत बसले त्यांनी गाडी जळगाव जामोद कडे न्यायला सांगितली. दरम्यान पातुर्डा फाट्यावर हिवाळे यांना एका थरमास मधील चहा पाजला. त्यानंतर हिवाळे बेशुद्ध झाले. हिवाळे यांना जाग आली तेव्हा ते मध्यप्रदेश हद्दीतील एका गावातील शेतात हात पाय बांधलेल्या अवस्थेत होते. त्यांची  तवेरा गाडी, नगदी ३०० रुपये व मोबाईल असा जवळपास पावणेचार लाख रुपयांचा मुद्देमाल चोट्टे घेऊन गेले होते. स्थानिकांच्या मदतीने हिवाळे यांनी कसेबसे शेगाव गाठून शेगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
   
  याप्रकणाची गंभीर दखल घेत एसपी सारंग आवाड यांनी एलसीबीचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांना तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार श्री.गीते यांनी एका पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार हिवाळे यांना सर्वप्रथम आलेल्या फोन नंबर चा शोध घेतला असता आरोपी जरा जास्तच शातीर असल्याचे पोलिसांना कळाले. आरोपींनी रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीच्या फोन वरून एक कॉल करुदया असे म्हणत तो कॉल केला होता. त्यामुळे तपासाची आशा जवळपास संपुष्टात आलेली असताना एलसीबी पथकाने शेगाव येथून मध्यप्रदेशात जाणाऱ्या रस्त्यावरील सर्व सीसीटिव्ही फुटेज तपासले मात्र तरीही सुगावा लागला नाही. अखेर तांत्रिक पद्धतीचा अवलंब करून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील पर्सापूर येथून शंभुसिंग तुळशीरामजी बिजोटे(५१) व दर्यापूर तालुक्यातील बेंबळा येथून आकाश सुखदेव कांबळे(२९) यांना ताब्यात घेतले. दोघांची कसून चौकशी केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व त्यांनी चोरलेली तवेरा गाडी सुद्धा पोलीस पथकाच्या ताब्यात दिली. आरोपींना शेगाव शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड, अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या आदेशाने एलसीबीचे सपोनि विलासकुमार सानप, सपोनि अमित वानखेडे, नापोकॉ गणेश पाटील, नापोकॉ  रवी भिसे,नापोकॉ राजू आडवे, पोकॉ गजानन गोरले, पोकॉ कैलास ठोंबरे यांनी केली.