भाईगिरी करण्यासाठी शस्त्र बाळगणे पडले महागात! जिल्ह्यातल्या ५५ जणांना जेलची हवा.! मात्र सार्वजनिक कार्यक्रमात तलवार दाखवणाऱ्या राजकीय नेत्यांविरुद्ध कारवाईची हिम्मत नाही

जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरियांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. अशातच घातक शस्त्राच्या बळावर शारीरिक व मालमत्तेचे गुन्हे घडू नये यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथके शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करीत आहेत. मागील दोन वर्षांत एलसीबीने आर्म ॲक्टच्या तब्बल ५५ कारवाया करून अनेक गुन्हेगारांना अटक केली आहे.
ही शस्त्रे येतात कुठून..
जिल्ह्यात पिस्तूल आणि धारदार शस्त्रे ही मध्य प्रदेश, अजमेर, इंदूर येथून येत आहेत. विशेष म्हणजे, घाटाखालील काही भागातील गावांत २५ हजारांपासून एक लाखापर्यंत शस्त्रे बनवून दिली जातात. केवळ खंडणी मागणीसाठी आणि गुन्हेगारी क्षेत्रात वर्चस्व कायम राहावे म्हणून शस्त्रे खरेदी केली जात असल्याची माहिती आहे. २०२१ मध्ये आर्म ॲक्टच्या १९ तर २०२२ मध्ये ३६ कारवाया करण्यात आल्या. मात्र असे असले तरी सार्वजनिक कार्यक्रमात तलवार दाखवून अभिवादन करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करण्याची हिम्मत पोलिसांनी दाखवली नाही.
तडीपार, फरारींना ठोकल्या बेड्या..
विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्यांसोबतच जिल्हा पोलिसांनी या दोन वर्षात २०२१ मध्ये १७ तडीपार, ३० फरारी तर २०२२ या वर्षात ३० तडीपार आणि ४५ फरारींवर कारवाई केली आहे. यासोबतच दोन एमपीडीएच्या कारवाया करून दोघांना स्थानबद्ध केले आहे.