ग्रामपंचायत निवडणुकीसाठी विनापरवाना वाहनावर लाऊडस्पीकर लावणे भोवले; गुंजाळा गावच्या सरपंचपदाच्या उमेदवाराविरुद्ध आचारसंहिता उल्लंघनाचा गुन्हा दाखल

 
andhera

चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांचा माहौल आहे. काल,१६ डिसेंबरला प्रचाराचा शेवटचा दिवस होता. उद्या १८ डिसेंबरला मतदान तर २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. यंदा थेट जनतेतून सरपंच पदाची निवडणूक असल्याचे सरपंच पदाच्या उमेदवारांनी पूर्ण ताकदीने प्रचार केला. काल,प्रचार आटोपला असला तरी आज आणि उद्या शेवटचे मतदान होईपर्यंत खरा -छुपा प्रचार होणार आहे. दरम्यान चिखली तालुक्यातील गुंजाळा गावच्या सरपंच पदाच्या उमेदवार अरूणा सुनील केदार यांच्याविरुद्ध आचारसंहितेचे उल्लंघन करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अंढेरा पोलीस ठाण्यात काल, १६ डिसेंबरच्या संध्याकाळी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरुणा केदार या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंचपदाच्या उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्या आहेत. १५ डिसेंबरला त्यांनी कोणतीही परवानगी घेता वाहनांवर लाऊस्पिकर, एलइडी द्वारे प्रचार केला.  निवडणुकांचा प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची परवानगी घेतल्यानंतरच त्या  वाहनाद्वारे प्रचार करता येतो, मात्र तशी कोणतीही परवानगी घेता प्रचार केल्याने चिखली पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विलास राजाराम अंभोरे यांनी अंढेरा पोलीस ठाण्यात  अरूणा केदार यांच्याविरुद्ध तक्रार दिली. अरुणा केदार यांच्यासह प्रचारासाठी वापरण्यात आलेल्या एम एच २८ ,बिबी ३६३९ व एम एच २८ एबी ३५३६ या वाहनांच्या चालकांविरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.