असंवेदनशीलता..!! आमदार श्वेताताई वगळता जिल्ह्यातल्या इतर लोकप्रतीनिधींना "त्या" १४ बळींचा विसर! समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या मजुरांना तडेगाव फाट्याजवळ झाला होता अपघात

बुलडाणा जिल्ह्याच्या चार तालुक्यातून आणि ५० गावांतून जाणाऱ्या या समृद्धी महामार्गाची जिल्ह्यातील लांबी ही ८७.२९१ किमी आहे. या मार्गावर प्रवेश करण्यासाठी जिल्ह्यात चार इंटरचेंज देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील महामार्गासाठी १ हजार २०४ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. हा महामार्ग बनवताना अनेक मजुरांचे बळी गेले. २० ऑगस्ट २०२१ रोजी सिंदखेडराजा तालुक्यातील तडेगाव फाट्याजवळ टीप्पर उलटल्याने झालेल्या अपघात १३ मजुरांचा जागीच तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. अपघातात मृत्यू झालेले सर्वच मजूर हे मध्यप्रदेशातील असल्याने जिल्ह्यातल्या नेत्यांची तेव्हाची असंवेदनशीलता दिसून आली होती.
एरवी सांत्वन भेटीसाठी जिल्हाभर फिरणारे नेते मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी महाराष्ट्रात आलेल्या मजुराच्या कुटुंबांना धीर देण्यासाठी तडेगाव कॅम्प मध्ये पोहचले नव्हते. कदाचित मृतक मजूर आणि त्यांच्या कुटुंबियांची नावे इथल्या मतदार यादीत नसावीत म्हणून हे झाले असावे. मात्र काल, या महामार्गाचे लोकार्पण होत असताना त्या मजुरांचे स्मरण होणे अपेक्षित होते. जिल्हास्तरीय कार्यक्रमात २ मिनिटांचा वेळ "त्या" मजुरांना श्रद्धांजली देण्यासाठी आयोजकांना देता आला असता, मात्र ते मजूर मध्यप्रदेशातील होते, दुसऱ्या प्रांतातील होते त्यामुळे तेवढी संवेदनशीलता त्यांना दाखवता आली नसावी...!