सलाईनद्वारे द्यायचे इंजेक्शन दंडात टोचले! रुग्णाचा हात कामातून गेला; चिखलीच्या ग्रामीण रुग्णालयातील प्रकार! ड्युटी ऑफिसर व परिचारिकेवर कारवाई करण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

 
gramin
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  सलाईनद्वारे द्यायचे इंजेक्शन चुकीच्या पद्धतीने व निष्काळजी पणाने दंडात टोचल्याने रुग्णाच्या हाताला अपंगत्व आल्याचा प्रकार चिखली येथील शासकीय रुग्णालयात समोर आला आहे. त्यामुळे निष्काळजी करणाऱ्या ड्युटी ऑफिसर व परिचारिके विरुद्ध नियमानुसार कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

 चिखली येथील विष्णू नारायण राऊत हे व्हायरल फिव्हर ने आजारी असल्याने २८ ऑगस्ट रोजी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात गेले होते. चिठ्ठी घेऊन ते कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांकडे गेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासले नाही. त्यानंतर परीचारीकेने  सलाईन मध्ये देण्याचे इंजेक्शन दंडात चुकीच्या पद्धतीने टोचले.

त्यामुळे रुग्णाचा तो हात गंभीरपणे दुखत असून त्या हाताला अपंगत्व आल्याचे रुग्णाचे म्हणणे आहे. डॉक्टर आणि परिचारिकेच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाला आपला हात गमवावा लागल्याने त्यांच्याविरुद्ध नियमाने कठोर कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नितीन राजपूत यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे केली आहे.