जिल्ह्यात वाढले दोषसिद्धीचे प्रमाण!; जिल्हा पोलिसांच्या प्रयत्नांना मोठे यश

 
jail
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : न्यायालयात गुन्हे सिद्ध होऊन गुन्हेगारांना शिक्षा होण्याच्या प्रमाणात जिल्ह्यात अलीकडील काळात वाढ झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यात विविध न्यायालयांनी दिलेल्या निकालांपैकी तब्बल ४७.४३ टक्के प्रकरणांत दोष सिद्ध झाले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्त्वात घेतलेल्या क्राईम मीटिंगमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. दोन महिन्यांपूर्वी राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक मधुकर पांडेय जिल्ह्यात आले होते, तेव्हाही त्यांनी राज्याच्या सरासरीच्या तुलनेत जिल्ह्याचे दोषसिद्धीचे प्रमाण चांगले असल्याचे सांगत जिल्हा पोलीस दलाची पाठ थोपटली होती.

कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वात पोलिसांकडून विविध उपक्रम राबवले जातात. गंभीर गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात सुद्धा पोलिसांना चांगले यश मिळत आहे. मात्र या गुन्हेगारांना न्यायालयासमोर उभे केल्यानंतर त्यांच्याविरुद्धचा गुन्हा सिद्ध करण्यात अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे जिल्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण ३५ टक्क्यांपलीकडे जात नव्हते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून हे प्रमाण वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना चांगले यश मिळाले असून, हे प्रमाण आता ४७ टक्क्यांवर पोहोचले आहे.

दोषसिद्धीच्या अडचणी...
न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर अनेकदा फिर्यादी, पंच, साक्षीदार फितूर होतात. त्यामुळे सबळ पुराव्याअभावी प्रकरण ढिले पडते. संशयाच्या फायद्यावरून तसेच वैज्ञानिक तज्‍ज्ञांचा अभिप्राय वेळेवर न मिळाल्याने, समन्स बजावूनसुद्धा साक्षीदार हजर न राहल्याने व न्यायालयाला पुराव्यांमध्ये विसंगती आढळल्यास दोषसिद्ध होण्यास अडचणी निर्माण होतात.

पोलिसांचे प्रयत्न...
दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्हा पातळीवर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तज्‍ज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्ह्यातील ३३ पोलीस ठाण्यांत आता कोर्ट पैरवी अधिकारी नेमण्यात आला आहे. गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात येत आहे. तपास अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासाची पडताळणी जिल्हा सनियंत्रण समितीकडून करण्यात येत असल्याने आता दोषसिद्धीचे प्रमाण वाढत आहे.