पाच महिन्यांत दीड हजार पापी जिल्हा पोलिसांच्या जाळ्यात! न सुधरणाऱ्यांना तडीपारचा इशारा..!!

 
karyaly
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांत तब्बल दीड हजार जुगाऱ्यांना बेड्या ठोकण्यात जिल्हा पोलिसांना यश आले आहे. केवळ ग्रामीण भागातच नव्हे तर आता शहरी भागातही पोलिसांच्या चोरून लपून जुगाराचा डाव रंगविण्याऱ्यांची संख्या वाढत असल्याचेच या आकडवारीवरून समोर आलेय. १ जानेवारी ते ३१ मे २०२२ या पाच महिन्यांत तब्बल १ हजार ४५८  जुगाऱ्यांचा रंगलेल्या डावाचा पोलिसांनी बेरंग केलाय..!

जुगाराचे पाप करणाऱ्या या पापी गुन्हेगारांकडून पोलिसांनी ५० लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त केला आहे. या पापी जुगाऱ्यामध्ये स्वतःला प्रतिष्ठित समजणाऱ्या काही राजकीय नेत्यांचा देखील समावेश आहे हे विशेष. अवैध दारू आणि जुगाऱ्यावर अंकुश ठेवण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर आहे. जुगाराने अनेकांचे संसार आतापर्यंत उध्वस्त झालेत. विशेष म्हणजे दिवसभर मजुरी करणारे मजूर त्यातून मिळवलेला पैसा देखील जुगारात उधळतात. अशा जुगाऱ्यावर पोलीस विभाग लक्ष ठेवून असला तरी ग्रामीण स्थरावर काहींच्या आशीर्वादाने हे जुगाराचे अड्डे बहरत असल्याची चर्चा आहे. 


जिल्ह्यातील ३३ पोलीस स्टेशनमध्ये गेल्या ५ महिन्यांत ८७३ कारवाया करण्यात आल्या. या कारवाईत १ हजार ४५८ पापी जुगाऱ्यांना बेड्या ठोकण्यात आल्या. सर्वाधिक कारवाया नांदुरा पोलीस स्टेशन  अंतर्गत करण्यात आल्या. नांदुरा पोलीस स्टेशन हद्दीत ६६, मलकापूर शहर ६२, चिखली ५९, बोराखेडी ५३, खामगाव शिवाजीनगर ५० अशा कारवाया करण्यात आल्या.