रागाच्या भरात म्हाताऱ्याने केला म्हातारीचा गेम; जीव जाईस्तोवर मारले; खामगाव तालुक्यातील धक्कादायक घटना

 
hivarkhed
खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव तालुक्यातील हिवरखेड येथे ७५ वर्षीय म्हाताऱ्याने स्वतःच्या ७० वर्षीय पत्नीचा खून केल्याचा प्रकार समोर आलाय.  म्हाताऱ्याविरुद्ध हिवरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पार्वताबाई एकनाथ वनारे (७०, रा.हिवरखेड, ता.खामगाव) असे मृत्यू झालेल्या म्हातारीचे नाव असून एकनाथ महादू वनारे(७५) असे खून करणाऱ्या म्हाताऱ्याचे नाव आहे.

त्याचे झाले असे की, शुक्रवारी संध्याकाळी म्हाताऱ्याच्या आणि म्हातारीचा वाद झाला. या वादातून म्हातारीने म्हाताऱ्याला काठी फेकून मारली. बायकोने काडी मारल्याच्या राग म्हातार्‍याला अनावर झाला. रागाच्या भरात म्हाताऱ्याने म्हातारीला काठीने बेदम मारहाण केली. गावकऱ्यांनी म्हातारीला खामगाव येथील सामान्य रुग्णालयात नेले,मात्र तोपर्यंत म्हातारीचा मृत्यू झाला होता.

म्हाताऱ्याने म्हातारीचा खून केल्याची चर्चा पसरली. पोलिसांनी तातडीने म्हाताऱ्याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. उतारवयात दोघांनी एकमेकांच्या आधाराने रहायचे असतांना म्हाताऱ्याने म्हातारीचा खून केल्याने खळबळ उडाली आहे.