बापाला आता साथ देणार नाही तर मग कधी? चिखलीतील माजी नगरसेवकाची फेसबुक पोस्ट चर्चेत; चिखलीच्या गवळीपुऱ्यातील घटना वाचून तुमच्या डोळ्यात पाणीही येईल अन् "त्या दोन" मुलांबद्दल संताप येईल..

 
jyuh
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  आठ दिवसांपासून ते त्यांच्या बंद घराआड पडून होते. त्यांची तब्येत प्रचंड खलावली होती, पोटात ना अन्नाचा कण ना पाण्याचा थेंब..कारण त्यांना जागचेही उठता येईना, त्यांना तशी दोन मुल..मात्र मुल त्यांच्यासोबत राहत नाहीत! बिचारा बाप त्यांनी वाऱ्यावरच सोडून दिला म्हणा.. ही दुर्दैवी कहाणी आहे चिखली शहरातील गवळी पुऱ्यातील  मनोहर सदाशिव चौधरी यांची. चिखली येथील माजी नगरसेवक दत्ता सुसर पाटील यांनी केलेल्या एका फेसबुक पोस्टमुळे श्री चौधरी काकांची दुर्दैवी कहाणी समोर आली आहे..

श्री चौधरी काका गेल्या ८ दिवसांपासून त्यांच्या घरात खितपत पडलेले होते. आठ दिवसांपासून घराचा दरवाजा आतून बंद असल्याने काही स्थानिकांनी ही माहिती प्राचार्य निलेश गावंडे यांना सांगितली. गावंडे यांनी लगेच माजी नगरसेवक तथा शिवसेनेचे  युवा नेते दत्ता सुसर यांना याबाबत कळवले. दत्ता सुसर यांनी घटनास्थळी धाव घेतली, आणि श्री चौधरी काकांच्या घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.

त्यानंतर काकांची अवस्था पाहून त्यांच्यासहित साऱ्यांनाच धक्का बसला.त्यांच्या पायाला मोठी दुखापत झाली होती, पायात अक्षरशः अळ्या पडल्या होत्या, दुर्गंधी पसरली होती. त्यांना प्रचंड वेदना होत होत्या, अंगात त्राण नसल्याने बोलताही येत नव्हते. दत्ता सुसर यांनी लगेच चिखली उपजिल्हा रुग्णालयात फोन करून कळवले, डॉक्टरांनी घटनास्थळी येऊन प्रथमोपचार केला आणि रुग्णवाहिकेने पुढील उपचारासाठी बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले.
   
 दरम्यान ८ दिवसांपासून बाप घरात मृत्यूशी झुंजत असताना त्यांच्या दोन्ही मुले त्यांच्यापासून दूर होते. श्री.चौधरी काका कृषी विभागात नोकरीला होते. दोन्ही मुलांना त्यांनी मोठे केले, त्यांची लग्न लावून दिली.मात्र  काकांची पत्नी वारल्यानंतर ते एकटेच राहत होते. दोन्ही मुले नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहतात. सेवानिवृत्ती नंतर मिळणाऱ्या पेन्शन मधून ते त्यांचा उदरनिर्वाह चालवत असल्याची माहिती सुसर यांनी मिळाली. त्यामुळे याविषयीची पोस्ट त्यांनी त्यांच्या फेसबुकवर टाकली.

या प्रकाराचा सविस्तर वृत्तांत पोस्टमध्ये लिहिला. "तुमच्या वडिलांची तब्येत सिरियस आहे, आता वडिलांना साथ देणार देणार नाही तर मग कधी?" अशी कळकळीची विनंती सुसर यांनी पोस्ट मधून चौधरी काकांच्या दोन्ही मुलांना केली. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या मुलांना जाग आली. रात्री उशिरा मुले उपचार घेत असलेल्या वडीलांजवळ पोहचल्याचे सांगण्यात आले आहे.