हृदयद्रावक..! पत्नीला कार शिकवतांना कार विहिरीत कोसळली; ब्रेक दाबण्याऐवजी एक्सीलेटरच दाबले! पत्नीसह चिमुकलीचा मृत्यू, शिक्षक पती गंभीर! देऊळगावराजाची घटना..

 
jhffgt
देऊळगावराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पत्नीला कार चालवणे शिकवीत असताना कारवरील नियंत्रण सुटून कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरीत कोसळली. या भीषण अपघातात पत्नीसह चिमुकल्या मुलीचा मृत्यू झाला असून  गंभीर जखमी पतीला रुग्णालयात हलविण्यात आले आहे. देऊळगाव राजा चिखली रोडवर आज, ३ नोव्हेंबरच्या दुपारी २ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.
  

jygy

देऊळगाव राजा चिखली रोडवरील देऊळगाव राजा जवळच हॉटेल विजय वाईन बार जवळ हा अपघात झाला. प्राप्त माहितीनुसार देऊळगाव राजा शहरातील रामनगर भागात राहणारे शिक्षक अमोल मुरकुटे  हे दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने त्यांची पत्नी स्वाती मुरकुटेला कार शिकवीत होते. त्यांच्यासोबत त्यांची पाचव्या वर्गात शिकणारी मुलगी सिद्धी मुरकुटे ही सुध्दा होती.

दरम्यान चिखली रोडवरील हॉटेल विजय वाईन बार जवळ कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या ७० फूट खोल विहिरीत कोसळली. यावेळी अमोल मुरकुटे  हे कसेबसे खिडकीतून बाहेर आले मात्र पत्नी आणि मुलीला ते वाचवू शकले नाहीत. घटनेची माहिती मिळताच देऊळगावराजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अमोल मुरकुटे यांना रुग्णालयात दाखल केले असून पत्नी व मुलीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात एकच शोककळा पसरली आहे.