भाच्याचे मामीसोबत होते प्रेमसंबंध!; पळूनही गेले होते; मामाला माहीत झाल्यावर दिल्या धमक्या! भाच्याने केली आत्महत्या!; महिनाभरानंतर घर साफ करतांना सापडली सुसाईड नोट; मोताळा तालुक्यातील खळबळजनक घटना!

 
dhamangavbade
मोताळा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ३० वर्षांचा तो अन् ३५ वर्षांची ती..नात्याने तो भाचा अन् ती त्याची मामी.. एकाच गावात घराशेजारी घर..तो मामाकडे जायचा.. मामीला कुठे जायचे असले की तो तिला घेऊन जायचा..अर्थात तेव्हा या गोष्टीला मामाची काहीही हरकत नव्हती..मात्र काही दिवसानंतर प्रकरण जास्तच पांगले..भाचा मामीच्या प्रेमात पडला अन् मामीही भाच्यासाठी जीव ओवाळून द्यायला तयार झाली..दोघांच्या गुप्त संबंधाची कुणकुण मामाला लागल्यावर मामाचा संताप अनावर झाला..नात्याला विरोध सुरू झाल्याने  भाचा आणि मामीने पळून जायचा निर्णय घेतला..दोघेही पळून गेले..मात्र नातेवाईकांनी दोघांना परत आणलेच..त्यानंतर मात्र मामा भाच्याला धमक्या देऊ लागला..तू आत्महत्या कर नाहीतर तुझ्या मामीला मारून तुझ्या नावाने चिठ्ठी लिहून फसवील..अखेर धमक्यांना घाबरून भाच्याने गळफास घेऊन आत्महत्या केली..मात्र आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेली चिठ्ठी काल, ६ मे रोजी महिनाभरानंतर घर साफ करतांना सापडली अन् या संपूर्ण घटनाक्रमाचा उलगडा झाला. मोताळा तालुक्यातील लिहा गावात राहणाऱ्या मामाविरुद्ध भाच्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

लिहा येथील रविंद्र उर्फ दीपक गुलाबराव चरावंडे याचे त्याच्या मामीसोबत( ३५) प्रेमसंबंध निर्माण झाले. अनेकदा कामानिमित्त मामीला घेऊन तो बाहेरगावी जायचा त्यामुळे दोघांमध्ये जवळीक वाढली. मात्र या नात्याची कुणकुण मामाला लागल्याने मामा आणि भाच्याचे वाद होऊ लागले. त्यामुळे रविंद्र आणि त्याची मामी मार्च महिन्यात घरून पळून गेले..भाचा आणि मामी भुसावळला राहत असल्याचे कळल्यावर नातेवाईकांनी दोघांना पुन्हा परत आणले..मात्र या प्रकारानंतर मामा भाच्याचे वितुष्ट प्रचंड वाढले. मामा भाच्याला वारंवार फोन करून धमक्या देऊ लागल्या..

"एकतर तू आत्महत्या कर नाहीतर मी माझ्या बायकोला मारून तुझ्या नावाची चिठ्ठी लिहून तुला फसवतो" अशी धमकी रविंद्रचा मामा त्याला वारंवार देऊ लागला. या धमक्यांना कंटाळून अखेर रविंद्रने ३० मार्च २०२२ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली..

याप्रकरणी धामणगाव बढे पोलीस ठाण्यात आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान काल, घराची साफसफाई करीत असतांना टिव्हीमागे रविंद्रने लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडली..अन् हा सारा घटनाक्रम समोर आल्याने एकच खळबळ उडाली..मामाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे  रविंद्रने लिहून ठेवल्याने त्याच्या मामाविरुद्ध धामणगाव बढे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक श्री गद्रे करीत आहेत.