कष्टाचे सोयाबीन चोरट्यांच्या घशात! ३३ कट्टे चोरले मग पोलिसांनी घेरले! कोलवड, माळविहीर, येळगावच्या शेतकऱ्यांची सोयाबीन चोरणारे चोरटे गजाआड!
पुंडलिक नारायण शिंदे या शेतकऱ्याने कोलवड शिवारातील घराच्या पोर्च मध्ये ठेवलेल्या ५८ कट्ट्यांपैकी ११ कट्टे चोरी गेल्याची तक्रार १६ जानेवारीला पोलिसात दिली होती. याप्रकरणी बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्पूर्वीही सावळा, माळ विहीर, येळगाव येथून शेतमाल चोरी गेल्याच्या तक्रारी दाखल आहेत. त्यामुळे पोलिसांनी तपास चक्र फिरविले. डीबी स्कॉट पथकाने सोयाबीन चोराचा सुगावा लावला. आशुतोष उर्फ बंड्या पडघान, ओमप्रकाश उर्फ डेनी राजाराम जाधव,(रा. मिलिंद नगर बुलडाणा), आप्पेचालक शेख आदाब शेख तसलीम (रा. इंदिरा नगर बुलडाणा) यांना अटक करण्यात आली. त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी सोयाबीन चोरी कुठे कुठे केली याची कबुली दिली. ही कारवाई ठाणेदार प्रल्हाद काटकर यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सखाराम सोनूने, माधव पेटकर,प्रभाकर लोखंडे, सुनील जाधव, महादेव इंगळे आदींनी केली.
या गावातून चोरला शेतमाल
शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेला शेतमाल आशुतोष उर्फ बंड्या पडघान, ओमप्रकाश उर्फ डेनी राजाराम जाधव, आप्पेचालक शेख आदाब शेख तसलीम या तिघांनी चोरला. ओन्ली नारायण शिंदे राहणार कोलवड यांच्या शिवारातून ११ कट्टे सोयाबीन, पवन कुमार रामधन आडवे रा. माळविहीर यांचे १२ सोयाबीनचे कट्टे, प्रमिलाबाई रामदास तायडे रा. माळविहीर यांचे ४ सोयाबीनचे कट्टे, सतीश जगताप रा. सावळा यांचे ४ सोयाबीनचे कट्टे, वैभव राजपूत रा.येळगाव यांचे २ सोयाबीनचे कट्टे असा ५ शेतकऱ्यांचा ३३ कट्टे शेतमाल या चोरट्यांनी चोरला.