चोरीच्या सोन्यात सोनाराचा हात!कोर्टाने फेटाळला अर्ज; देऊळगाव राजाचे प्रकरण

 
deulgavraja
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  चोरीचे सोन्याचे दागिने विकणारा आणि विकत घेणाऱ्याचा जामीनअर्ज देऊळगाव राजा न्यायालयाने फेटाळला आहे.

देऊळगांव राजा येथील शिंगणे नगर येथे राहणाऱ्या रेखा प्रकाश पाठमासे यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून एकूण १ लाख २६ हजारचे दागिने चोरी केले होते.यानुसार पोलीस स्टेशन देऊळगाव राजा येथे  गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास ठाणेदार सातव यांच्या मार्गदर्शनाखाली ए.एस.आय प्रदीप गुंजकर यांच्या कडे देण्यात आला होता. पोलीसांनी सदर तपासाचे चक्र फिरवताच गुन्ह्यात अजय पाठमासे या आरोपीची चौकशी केली असता त्याने  चोरी केल्याचे कबुल केले आणि या गुन्ह्यात चोरलेल्या सोन्याचे दागिन्यांची कुठे कशी व कोणाच्या मदतीने विल्लेवाट लावली याची कबुली पोलिसांना दिली होती.

या नंतर पोलिसांनी अभिषेक बंगाळे ,राहुल शिवरकर ,अफरोज शहा उर्फ वाल्या यांना अटक करून चौकशी केली. अफरोज शहा याने कबुली दिली की सदर चोरी मधील सोन्याचे झुंबर १ जोड, सोन्याचे सेव्हन पीस, सोन्याचे कानातील वेल ,सोन्याचे गहूमनी पोत एकूण किंमत ३० हजार रु चे दागिने परीस ज्वेलर्स चे मालक संदीप दत्तात्रय शहाणे रा .भगवान बाबा नगर यांना विकल्याचे कबुल केले होते. त्या नंतर तपास अधिकारी गुंजकर यांनी संदीप शहाणे  यांना चौकशी साठी पोलीस स्टेशन देऊळगाव राजा येथे बोलावले असता त्यांनी कबुली दिली की मी सदर दागिने १५ दिवसा पूर्वी अफरोज शहा यांच्या कडून  विकत घेऊन वितळून टाकले आहे.

सदर चोरीचा मुद्देमाल पंचसमक्ष हस्तगत केला व यातील आरोपी संदीप शहाणे यांनी चोरीचा मुद्देमाल विकत घेतल्याने कलम ४११भा. द. वि.नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.आज  अफरोज शहा आणि संदीप शहाणे या आरोपींना  देऊळगाव राजा येथील न्यायालयातील प्रमुख मुख्य न्यायाधीश श्री. शैलेश कंठे यांच्या समोर हजर केले असता आरोपींनी जामिनी वर सुटका होणे साठी जामीन अर्ज दाखल केला होता.त्यावर न्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेतल्या नंतर याच गुन्ह्यातील पूर्वीचे तीन आरोपींचा जमीन अर्ज फेटाळून लावल्याने तसेच या वरील सर्व आरोपींनी एकत्रित हेतू ठेवून सदर चा गुन्हा केल्याचे आणि प्रथम दर्शनी तपासा मध्ये निष्पन्न झाल्याचे तसेच गुन्ह्यात चोरी गेलेला संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केल्याचे देऊळगाव राजा येथील सरकार पक्षा तर्फे  विशेष सहाय्यक सरकारी वकील अनिल शेळके यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याने तसेच भरीव युक्तिवाद केल्याने  न्यायालयाने चोरीचा मुद्देमाल विकणाऱ्या व चोरीचा मुद्देमाल विकत घेणाऱ्याचा जामीन अर्ज फेटाळला . व  त्यांची बुलडाणा कारागृह येथे रवानगी करण्यात आली.