देवा काय चुकल रे या चिमुकल्यांच! सगळ दुःख त्यांच्याच वाट्याला का? आईचा सर्पदंशाने मृत्यू;आजी हार्ट अटॅक ने दगावली! कर्जापाई वडिलांनी आत्महत्या केली !

 एकापाठोपाठ तिघांनी जगाचा निरोप घेतल्याने बहीण - भाऊ पोरके! धोत्रा  नंदई येथील हृदयद्रावक घटना वाचून तुमच्या डोळ्यात पाणी येईल
 
 
hyu
देऊळगावराजा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जगातली सगळी दुःख जणू काही त्यांच्याच वाट्याला आली की काय असे कुणालाही वाटेल. आई, आजी आणि आता वडील एकापाठोपाठ घरातील तिघे देवाघरी गेल्याने चुमकली बहीण आणि भाऊ पोरके झालेत. देऊळगाव राजा तालुक्यातील धोत्रा नंदई येथील या हृदयद्रावक घटनेने समाजमन सुन्न झालेय. अभिषेक नागरे(१५) आणि आरती नागरे (१३) अशी या भावंडांची नावे आहेत.

धोत्रा नंदई येथील पुंजाजी सीताराम नागरे( चिमुकल्यांचे आजोबा) यांच्याकडे दीड एकर जमीन.  त्या शेतजमिनीवर त्यांनी स्टेट बँकेकडून पिककर्ज घेतले.  मात्र काही दिवसानंतर अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. त्यापाठोपाठ त्यांची सून ज्योती नागरे यांना शेतात काम करीत असताना सर्पदंश झाल्याने मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी हे सौदाजी नागरे हे सांभाळत होते. वृध्द  आई आणि दोन चिमुकली मुले यांची जबाबदारी सौदाजी नागरे यांच्यावर होती. शेती आणि मोलमजुरी करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते.

चिमुकल्यांच्या आजीला हार्ट अटॅक

दरम्यान मुलाचे आणि नातवांचे पुढे काय होईल, कसे होईल असा विचार सातत्याने करीत असल्याने चिमुकल्यांच्या आजीचा सहा महिन्यांआधी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर दोन मुलांची जबाबदारी वडील सौदाजी नागरे यांच्यावरच आली. दोन मुलांचे शिक्षक, घरात हाताने स्वयंपाक करणे, कपडे धुणे अशी सगळी कामे सौदाजी नागरे करीत होते. काही दिवसांआधी मुलगा आणि मुलीला त्यांच्या चुलत मामांनी सरंबा येथे नेले होते. मुलाला मलकापूर पांग्रा येथील शाळेत तर  मुलीला सरंबा येथील जिल्हा परिषद शाळेत टाकण्यात आले.
   
वडिलांनी केली आत्महत्या..!

आई, वडील आणि पत्नी यांचा मृत्यू डोळ्यादेखत पाहिलेले सौदाजी नागरे हे तणावात होते. एक एकर जमिनीत कर्ज फेडता येईल का, मोलमजुरी करून मुलांचा उदरनिर्वाह करता येईल का याचा विचार ते सातत्याने करीत होते. दरम्यान १० सप्टेंबर रोजी त्यांनी विषारी औषध प्राशन केले. उपचारादरम्यान १३ सप्टेंबर रोजी जालना येथे त्यांचा मृत्यू झाला. आजोबा, आई, आजी आणि वडील अशा चौघांचाही मृत्यू झाल्याने चिमुकले बहीण - भाऊ पोरके झाल्याने समाजमन सुन्न  झाले आहे. दरम्यान माजी जिल्हा परिषद सदस्य भगवानराव मुंडे यांनी मुलगी आरती नागरे हिला दत्तक घेतले असून तिच्या शिक्षणाची व लग्नाची जबाबदारी उचलली आहे.