सुलतानपुरचा खादाड पांडेंबा! ४ हजार रुपयांची लाच खातांना रंगेहाथ पकडला! महसूल विभागात खळबळ

 
kraim
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पगार कितीही जास्त असुद्यात मात्र काहींचा खाण्याचा छंद काही केल्या सुटत नाही. सुलतानपुरचा लाचखोर पांडेबा सुद्धा त्या बाबतीत चांगलाच खादाड ठरला आहे. तहसीलदारांना अहवाल लवकर सादर करतो तुम्ही फक्त ४ हजार रुपये द्या अशी मागणी या लाचखोराने ज्यांच्या शेत रस्त्यावर अतिक्रमण झालेय त्यांना केली. पोट फुटेस्तोवर खाणाऱ्या या लाचखोर तलाठ्याला यावेळी मात्र चांगलीच अद्दल घडली. ४ हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना त्याला एसीबीने रंगेहाथ अटक केली. सुलतानपूर, ता. लोणार येथील हॉटेल जय भोलेनाथ  येथे ही कारवाई करण्यात आली. प्रमोद हरिभाऊ दांदडे(५१, रा शिवाजी चौक, उदयनगर, ता.चिखली) असे लाच खाणाऱ्या तलाठ्याचे नाव आहे. तो सुलतानपूर येथे तलाठी म्हणून कार्यरत होता.

सुलतानपूर येथील ४५ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदाराच्या शेतीच्या वहीवाटीच्या रस्त्यावर सुलतानपूर येथील एका महिलेने अतिक्रमण केले होते. त्यासंबंधीची तक्रार तक्रारदार शेतकऱ्याने तहसीलदारांकडे केली होती. तहसीलदारांनी या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश तलाठी, मंडळ अधिकारी व ग्रामसेवक यांना दिले होते. हा अहवाल तहसीलदारांना लवकर पाठविण्यासाठी लाचखोर तलाठ्याने तक्रारदार शेतकऱ्याला ४ हजारांची लाच मागितली. शेतकऱ्याला लाच द्यायची नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. काल, दुपारी तक्रारीची सत्यता पडताळणी झाल्यानंतर सायंकाळी तलाठ्याला ४ हजार घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलडाण्याचे पोलीस उपअधीक्षक संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबी बुलडाणा चे पोलीस निरीक्षक सचिन इंगळे, पोहेकॉ राजू क्षीरसागर, पोना प्रविण बैरागी, जगदीश पवार,  पोकॉ अझरुद्दीन काझी, पोकॉ अरशद शेख यांनी केली