दिवाळीसाठी आत्याच्या घरी पाहुणी आलेल्या विवाहितेने घेतला गळफास! धाड मध्ये खळबळ

 
dhad
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  दिवाळी साठी सासरहुन आत्याच्या घरी  पाहुणी आलेल्या एका विवाहितेने घराच्या ओसरीत गळफास लावून आत्महत्या केली.  आज २५ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजेच्या  ही घटना बुलडाणा तालुक्यातील धाड येथे समोर आली. रोहिणी समाधान मोरे(२५) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

शहरातील लालबंदी गायीचे गोठाण परीसरात असलेल्या यमुनाबाई कडुबा दांडगे यांच्या घरी आज सकाळी त्यांची भाची वर्षा उर्फ रोहीणी समाधान मोरे  (२५, रा. रहीमाबाद ता.सिल्लोड ) ही दिवाळी करण्यासाठी आली होती. दरम्यान आज सकाळी तीची आत्या यमुनाबाई ह्या घरघुती सामान आणण्यासाठी बाहेर गेल्या होत्या.  त्याच वेळी  पाहुणी म्हणून आलेल्या रोहिणीने घराच्या ओसरीतील लाकडाला ओढणीच्या साह्याने गळफास घेवुन आपली जीवनयात्रा संपवली.

आत्महत्या करण्यापुर्वी विवाहितेने ओसरीचा दरवाजा आतुन बंद केला होता. काही वेळानंतर आत्या घरी आली असता त्यांना ओसरीचा दरवाजा आतुन बंद असल्याचे दिसले. यावेळी त्यांनी रोहीणीला आवाज दिला. मात्र आतुन कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शंका आल्याने शेजारील नागरिकांनी ओसरीच्या दरवाजातून आत पाहीले असता रोहीणीने गळफास लावुन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.

घटनेची माहिती मिळताच धाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवुन पंचनामा केला. रोहिणीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी धाड येथील ग्रामीण रुग्णालयात हलविला. मृतक विवाहितचे माहेर मोहोज असुन तीचे सासर हे सिल्लोड तालुक्यातील रहीमाबाद आहे. मृतक विवाहितेच्या पश्चात एक मुलगा व एक मुलगी असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही. पुढील तपास धाड पोलीस करीत आहेत. ऐन दिवाळी सणात ही घटना घडल्याने धाड मध्ये खळबळ उडाली आहे.