शेतकऱ्यांनो शेतात काम करतांना जरा जपूनच! अस्वलाच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी; चिखली तालुक्यातील आणखी एक घटना; एक दिवसाआधी महिला झाली होती अस्वलाची शिकार..!!

 
uyjhfy
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):   शेतकऱ्यांचा सध्या रब्बीचा हंगाम सुरू आहे. गहू, तुर, हरभरा ,कांदा या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री बेरात्री शेतात जावे लागते. मात्र अशातच जंगली प्राण्यांचा मुक्त वावर शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरत आहे. २७ डिसेंबरला चिखली तालुक्यातील मुरादपूर येथील महिला अस्वलाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक घटना समोर आली आहे. शेतात काम करणाऱ्या तरुणावर अस्वलाने हल्ला केल्याने तरुण गंभीर जखमी झालाय.

चिखली तालुक्यातील डोंगरशेवली येथे अस्वलाच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. राहुल राम भुतेकर (२२, रा. डोंगरशेवली, ता.चिखली) असे तरुणाचे नाव आहे. आज सकाळी राहुल शेतात काम करीत होता. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या अस्वलाने राहुल वर हल्ला केला. या हल्ल्यात राहुल गंभीर जखमी झाला. त्याने आरडाओरड केल्याने आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी धावत आले, त्यामुळे अस्वलाने पळ काढला. राहुल वर बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान परिसरातील शेतकरी 
मात्र दहशतीत आहेत.