अतिवृष्टीने खचला शेतकरी!जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले; सरकारला लाज नाही...

 
jghjg
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ऐन पीक काढणीच्या वेळेला कोसळधार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. हातातोंडाशी आलेला घास निघून जातो की काय अशी परिस्थिती जिल्ह्यातील बहुतांश भागात आहे. या नुकसानीमुळे शेतकरी खचून गेल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात काल, १२ ऑक्टोबरला दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मात्र सर्वदूर असे चित्र असले तरी सरकार कडून मात्र अजून तातडीची पावले उचलण्यात आली नाहीत. सोयाबीन आणि कापसाच्या दरात घसरण सुरूच आहे  त्यामुळे सरकारला लाज नाही अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहेत.

मलकापूर तालुक्यातील देवधाबा येथील शेतकरी नामदेव रामदास शिर्के(५०) यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्याकडे तीन एकर शेती आहे . मात्र सततची नापिकी, अतिवृष्टी व वाढत्या कर्जाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्यावर भारतीय स्टेट बँक कृषी शाखा मलकापूरचे एक लाख रुपयांचे कर्ज होते.
   
 दरम्यान दुसरी आत्महत्येची घटना चिखली तालुक्यातील अंचरवाडी शिवारात समोर आली. चिखली तालुक्यातील केळवद येथील एम. ए. डी. एड झालेल्या उच्चशिक्षित शेतकऱ्याने अंचरवाडी शिवारातील खडकपूर्णा कालव्यात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.  समाधान विठ्ठल पांढरे ( ३२, रा. केळवद) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. समाधान पांढरे यांच्याकडे ४ एकर कोरडवाहू शेती होती. केळवद स्टेट  बँक शाखेचे त्यांच्यावर १ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज होते. अतिवृष्टी व सततच्या नापिकीमुळे होणाऱ्या आर्थिक विवंचनेला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.