जिल्ह्यात तोतया जिल्हाधिकारी सक्रिय? दोन उपविभागीय अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने फेक मॅसेज! जिल्हाधिकारी तर समोरच बसले होते...

 
adhikari
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांच्या नावे जिल्ह्यातल्या दोन उपविभागीय अधिकाऱ्यांना बनावट संदेश पाठविणाऱ्या विरूद्ध बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात गुरूवारी, १९ जानेवारी रोजी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी सायबर गुन्हे शाखा तपास करीत असून तपासासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात येत आहे.

मेहकरचे उपविभागीय अधिकारी गणेश राठोड यांनी याप्रकरणी बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. श्री. राठोड हे जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रशिक्षणास आले होते. दरम्यान त्यांना दुपारी दोन वाजताच्या सुमारास ८३३०००७२९५  या क्रमांकावरून एक संदेश आला. या संदेशाला उत्तर देताना आपण कोण आहात अशी विचारणा केल्यानंतर आपण जिल्हाधिकारी एच. पी. तुम्मोड, आयएएस अशा आशयाचा संदेश पाठविला. मात्र त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. तुम्मोड राठोड यांच्यासमोरच बैठकीत बसलेले होते त्यामुळे श्री. राठोड यांना याबाबत साशंकता वाटल्याने त्यांनी सदर व्हॉटस् ॲपची तपासणी केली असता सदर क्रमांकावर एच. पी. तुम्मोड, आयएएस आणि डीपी ठेवलेला असल्याचे आढळून आले. सदरील मोबाईलधारक व्यक्ती हा बनावट असल्याची खात्री पटल्यानंतर  श्री. राठोड यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.

 दरम्यान नागरिकांनी त्यांच्या तक्रारी, समस्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात रितसर लेखी तक्रार नोंदवावी. आवश्यकता असल्यास प्रत्यक्ष भेटून निवेदन द्यावे.   जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे येणाऱ्या व्हॉटस् ॲपवरील बनावट संदेशाला कोणताही प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.