खळबळजनक! करणी कवटाळ केल्याच्या संशयावरून सख्ख्या बहिणीचा खून! मृतदेह फेकला विहिरीत; बुलडाणा तालुक्यातील चांडोळची घटना

प्राप्त माहितीनुसार धनाबाई सुभाष गोमलाडू (६०, रा . चांडोळ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. महिलेच्या मुलाने दिलेल्या तक्रारीनुसार धनाबाई काल, २८ सप्टेंबरला शेतात गेल्या होत्या. मात्र रात्री उशिरा झाली तरी त्या घरी परतल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या मुलांनी शोध घेतला असता गावातील शामराव राऊत यांच्या शेतातील विहिरीत धनाबाई यांचे प्रेत तरंगताना दिसून आले. घटनेची माहिती मिळताच धाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रेत बाहेर काढून पंचनामा केला. दरम्यान धनाबाई यांच्या कपाळावर जखम असल्याने तसेच त्यांच्या अंगावर साडी नसल्याने घातपाताचा संशय असल्याने त्यादृष्टीने तपासाला सुरुवात केली.
दरम्यान धनाबाई आणि त्यांचा भाऊ हिरालाल रतनसिंग बावणे (६२) यांच्यात गेल्या काही वर्षांपासून शेतीचे वाद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हिरालाल बावणे यांच्या गजानन नावाच्या मुलाचा मागील काळात मृत्यू झाला होता. त्यामुळे आपला मुलगा गजानन याला बहीण धनाबाई हिनेच करणी कवटाळ करून मारल्याचा संशय हिरालालला होता. त्याच संशयावरून हिरालाल त्याची पत्नी गोपीबाई, मुलगा संजय आणि रंजीत या चौघांनी मिळून धनाबाईचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी धनाबाईचा मृतदेह विहिरीत फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांनी घटनास्थळी भेट दिली. धनाबाई च्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.