खळबळजनक! विहिरीतून पाणी नव्हे तर चक्क मोटारसायकली काढल्या. शेगाव - वरवट रोडवरील सापडल्या २२ मोटारसायकली; दुसऱ्या विहिरीतही खजाना...

जिल्ह्यात दुचाकी चोरी वाढली होती. याचा छडा लावण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली. दरम्यान जिल्ह्यातील शेगाव परिसरातील वरवट मार्गावरील एका विहिरीतून आतापर्यंत १० दुचाक्या काढण्यात आल्या. तपासचक्र फिरविल्यावर, पोलिसांनी शेगाव येथील ईदगाह प्लॉट परिसरात राहणाऱ्या सैय्यद वसिम सैय्यद इस्लाम (३८ ) याला ताब्यात घेऊन दुचाकी चोरीबाबत चौकशी केली होती.
यावेळी सैय्यद वसिम याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर पोलिसी हिसका दाखवला असता सैय्यद वसिमने गुन्ह्यांची कबुली दिली. काही दुचाक्यांची मोडतोड केली असल्याचीही माहिती आहे. त्याच्यासोबत आणखी काही जण या टोळीत असून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही टोळी दुचाकीचे वेगवेगळे पार्ट करून नंतर दुचाकी विहिरीत टाकत होते.एका विहिरीतून आतापर्यंत १० दुचाक्या काढण्यात आल्या. २२ दुचाकी सापडल्याची माहिती असून, आणखी एका विहिरीत दुचाक्या असल्याची माहिती मिळत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी एसडीपीओ अमोल कोळी व पोलीस कर्मचारी दाखल आहेत.