खळबळजनक! गाढ झोपेत असलेल्या पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करून केला खून; नंतर स्वतः घेतला गळफास; जळगाव जामोद हादरले...!!

प्राप्त माहितीनुसार माऊली भोटा येथील ६० वर्षीय बुधाजी वानखेडे हे मानसिक रोगी असल्याने पत्नीसह शेतातील झोपडीत राहत होते. चार दिवसांपासून बुधाजी वानखेडे हे स्वतःच्या मनाशीच बडबड करीत होते , यातून त्यांचे पत्नी शोभा बाई यांच्यासोबत भांडण होत होते. दरम्यान २७ डिसेंबरच्या रात्री गाढ झोपेत असलेल्या शोभाबाई वानखेडे यांच्या मानेवर बुधाजी वानखेडे यांनी कुऱ्हाडीने वार केले. यात शोभाबाई यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यानंतर बुधाजी वानखेडे यांनी झोपडीत असलेल्या कापसाच्या गंजीवर चढून झोपडीत असलेल्या लोखंडी अँगल ला गळफास घेतला.
दरम्यान सकाळी बुधाजी वानखेडे यांचा मुलगा सदानंद वानखेडे हा गव्हाला पाणी देण्यासाठी शेतात आला. त्यावेळी त्याने वडिलांना आवाज दिला मात्र कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यानंतर त्याने झोपडीजवळ जाऊन पाहिले असता त्याच्या आईचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला, तर वडील बुधाजी वानखेडे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. त्याने आरडाओरडा केल्यानंतर गावातील लोकांनी घटनास्थळी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.