खळबळजनक! घरच्यांचा प्रेमाला विरोध; विवाहित आतेभाउ अन् मामेबहिणीने लॉज मध्ये घेतला गळफास; लहान्या भावाला व्हिडिओ कॉल करून सांगितले,गळफास घेतोय! खामगाव हादरले...

 
loj
खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  खामगाव शहरातील आदर्श लॉज मध्ये प्रेमीयुगलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. आज, १७ नोव्हेंबरला दुपारी ही धक्कादायक घटना घडली. आत्महत्या केलेले दोघे आतेभाऊ - मामेबहीण असे नातेवाईक आहेत.

शितल नितोने (२३, रा.नांदुरा) व विकास पंजाबराव सावळे( रा. कळंबा महागाव, जि अकोला) अशी मृतकांची नावे आहेत. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विकास हा शितलचा आतेभाऊ आहे. दोघांचे प्रेमसंबंध होते. मात्र घरच्यांच्या विरोधामुळे दोघांचे लग्न होऊ शकले नाही. दरम्यान शीतल चा विवाह नांदुरा येथील सुनील नितोने याच्यासोबत झाला, तिला सध्या दोन जुळी मुले आहेत. दरम्यान विकासचेही लग्न झाले, त्यालाही दोन मुले आहेत. शीतल कामासाठी मुंबईला जात होती तर तिचा पती मुलांचा सांभाळ करीत असायचा.
   
 मात्र असे असले तरी शीतल आणि विकासचे एकमेकांवरील प्रेम कमी झाले नव्हते. दोघेही आपापल्या संसारात सुखी नव्हते. त्यामुळे दोघेही एकमेकांना अनेकदा भेटत होते. दरम्यान काल, १६ नोव्हेंबरच्या रात्री शीतल आणि विकास आदर्श लॉज मध्ये मुक्कामासाठी थांबले होते. आज, १७ नोव्हेंबरला सकाळी विकासने त्याच्या लहान भावाला व्हिडिओ कॉल करून आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. त्यामुळे भांबावलेला त्याचा भाऊ लगेच खामगावच्या दिशेने निघाला. आदर्श लॉज वर येऊन त्याने जोरजोरात खोलीचा दरवाजा ठोठावला ,मात्र तोपर्यंत विकास आणि शितलने आत्महत्या केली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला असून तपास सुरू आहे.