खळबळजनक! दारू अन् दुधाच्या उधारीवरून झाला वाद; दारुड्याने दारू विकणाऱ्या वृद्धाच्या डोक्यात विट घालून खून केला! दोन तासांत आरोपी गजाआड; मलकापूर शहरातील घटना

 
hbjkhm
मलकापूर( गजानन ठोसर: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दारू आणि दूध विकण्याच्या धंदा करणाऱ्या वृद्धासोबत उधारीच्या पैशावरून वाद झाल्याने दारुड्याने ६० वर्षीय वृद्धाच्या डोक्यात विट घालून खून केला. आज १६ जूनच्या सकाळी मलकापूर शहरातील गाडेगाव हनुमान मंदिर पवनसुत नगरात ही खळबळजनक घटना उघडकीस आली. मलकापूर शहर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत आरोपीला गजाआड केले असून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अशोक उत्तम सोनोने (६०, रा. मलकापूर) असे मृतकाचे नाव असून विष्णू शालीग्राम चंदन (४०) असे अटक करण्यात आलेल्या खुन्याचे नाव आहे.

याबाबत प्राप्त माहितीनुसार मृतक अशोक सोनोने यांच्याकडे बकऱ्या असून बकऱ्याचे दूध विकण्याचे अवैधरित्या  दारू विक्री करण्याचा व्यवसाय ते करत होते. आरोपी विष्णू चंदन हा सोनोने यांच्याकडून दूध व दारू उधारीत घेत होता. त्यामुळे चंदन याच्याकडे जवळपास ४ रुपयांची उधारी झाली होती. मात्र तरीही तो पैसे द्यायला तयार नव्हता. चंदन पुन्हा सोनोने यांच्याकडे दारू घेण्यासाठी गेला असता आधीच्या उधारीवरून दोघांत वाद झाला. या वादातच त्याने सोनोने यांच्या डोक्यात विटेचा जोरदार प्रहार केला. त्यामुळे सोनोने रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.

आज सकाळी ८ वाजले तरी सोनोने  झोपेतून उठले नसल्याने स्थानिकांमध्ये वेगवेगळी चर्चा सुरू झाली. त्यांच्या घरातील लाईट सुद्धा सुरू होता. पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते गजानन ठोसर यांना ही माहिती मिळताच त्यांनी घरात जाऊन पाहिले असता  सोनोने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत दिसले. ठोसर यांनी मलकापूर शहर पोलिसांना माहिती देताच ठाणेदार विजयसिंह राजपूत, डी. बी. पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्मिता म्हासाए, पोलीस उपनिरीक्षक बालाजी सानप, रतंनसिंग बोराडे, पोकॉ ईश्वर वाघ,प्रमोद राठोड, सलीम बरडे, संतोष कुमावत, शेख आसिफ, मंगेश चरखे, निलेश तायडे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. 

घटनेची माहिती मिळताच ऊपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाच्या सूचना दिल्या. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आधी तीन संशयितांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयितांपैकी दोघांनी विष्णू चंदन हाच सोनोने यांच्याकडे जात होता असे सांगितले. त्यामुळे चंदन याच्यावरील संशय बळावल्याने पोलिसांनी त्याची कठोर चौकशी केल्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली. मृतक अशोक सोनोने यांची सून सौ. चंदा निलेश सोनोने हिच्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी विष्णू चंदन विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.