खळबळजनक! मेहकरात दादागिरी वाढली; ठाकरे गटाच्या शिवसेना तालुकाप्रमुखांना दाखवली तलवार; तालुकाप्रमुख म्हणाले, हा धाक दाखवायचा प्रयत्न

 
nimbaji
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर शिवसेना तालुका प्रमुखांना ( ठाकरे गट) भर रस्त्यात अज्ञातांनी तलवार दाखवून धाक निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. काल रात्री पावणे नऊच्या सुमारास मेहकर -डोणगाव रस्त्यावरील नागापूर गावाजवळ हा प्रकार घडला. डोणगाव पोलीस ठाण्यात तालुका प्रमुख निंबाजी पांडव यांनी याप्रकरणाची तक्रार दिली आहे.

शिवसेना ( ठाकरे गट) तालुकाप्रमुख निंबाजी पांडव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार काल, २० तारखेला ते पक्षाच्या कामाकरीता मेहकर येथे आले होते. दिवसभरातील काम आटोपून मोटारसायकलने डोणगाव येथे जात असताना रात्री पावणे नऊच्या सुमारास नागापूर जवळ एका मोटारसायकल वरील दोन अज्ञातांनी पांडव यांच्या गाडीला ओव्हरटेक केले.

 त्यामुळे पांडव यांनी त्यांच्या मोटरसायलचा वेग कमी केला असता त्या मोटरसायकलवर पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने तलवार काढून ती पांडव यांना दाखवली. त्यामुळे पांडव यांनी तातडीने गाडी थांबवत पोलिसांना फोन केला असता दोघे अज्ञात दुचाकीस्वार फरार झाले. कुणीतरी व्यक्तीने तलवार दाखवून आपल्याला धाक दाखविण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात सुद्धा खळबळ उडाली असून मेहकरात दिवसेंदिवस गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याचे बोलले जात आहे.