खळबळजनक! शेतरस्त्याच्या वादावरून रक्तपात! ८ जणांनी मिळून केला शेतकऱ्याचा खून! ३ महिलांना अटक! नांदुरा तालुक्यातील घटना

 
5yy
नांदुरा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतरस्त्याच्या वादावरून बाप लेकांनी व नातेवाईकांनी मिळून चुलत्याचा कुऱ्हाड, चाकू, लाकडी दांडक्याने खून केला. काल, २५ मे रोजी सकाळी नांदुरा तालुक्यातील वडाळी शिवारात ही घटना घडली असून पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणी ३ महिलांना अटक केली आहे.

पेरणीच्या तोंडावर शेतरस्त्यावरून वाद होण्याच्या घटना दरवर्षी जिल्ह्यात घडतात. मात्र हा वाद थेट जीवावरच उठल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या घटनेत खून करणारे हे मृतकाचे नातेवाईक आहेत. रवींद्र सुखदेव सरदार(६५, वडाळी , ता. नांदुरा)  असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. रवींद्र सरदार यांचा त्यांच्या भावासोबत व नातेवाईकांसोबत शेतरस्त्यावरून जुना वाद होता. घरासमोरील नळावर पाणी भरण्यावरून सुद्धा त्यांच्यात वाद झाला होता मात्र तो मिटविण्यात आला होता. दरम्यान काल, सकाळी रवींद्रसिंग सरदार शेतात जात असताना त्यांचा त्यांच्या नातेवाईक आरोपींशी वाद झाला.

त्यामुळे गौतम  सुखदेव सरदार, आकाश गौतम सरदार, अनिता गौतम सरदार, प्रकाश दशरथ वानखेडे, रेखा प्रकाश वानखेडे, मनकरना ज्ञानेश्वर जवंजाळ यांनी कुऱ्हाड, चाकू व लाकडी दांडक्याने रवींद्र सरदार यांची हत्या केली . रवींद्र सरदार यांचा मुलगा सागरने रात्री उशिरा नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून ७ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून तीन महिलांना अटक केली आहे. तपास नांदुरा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सिध्देश्वर उमाळे करीत आहेत.