खळबळजनक! सोन्याच्या दागिन्यांसाठी बापलेकांनी केला ६५ वर्षीय सेवानिवृत्त महिलेचा खून! मृतदेह प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून दुसऱ्या जिल्ह्यात नेऊन फेकला; मलकापूर हादरले

 
ugjhg
मलकापूर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सोन्याच्या दागिन्यांच्या मोहापायी घराशेजारी राहणाऱ्या सेवानिवृत्त महिलेचा बापलेकांनी खून केला. महिलेचा मृतदेह प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये भरून दुसऱ्या जिल्ह्यात फेकून दिला. मृतक महिला आणि खून करणारे बापलेक मलकपुरच्या गणपती नगर भागातील रहिवासी आहेत. प्रभा माधव फाळके(६५) असे मृतक महिलेचे नाव असून त्या मलकापूर नगरपरिषदेतून सेवानिवृत्त झाल्या आहेत.

२७ ऑगस्ट रोजी त्या परिसरातील मंदिरात पूजेसाठी गेल्या होत्या. त्यानंतर रात्री त्या घरी परतल्या नाहीत.त्यामुळे प्रभा फाळके यांचा शोध सुरू करण्यात आल्या. सगळीकडे शोधूनही त्या मिळून न आल्याने मलकापूर शहर पोलिस पाटील ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. दरम्यान २९ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर मार्गावर कुंड गावाजवळ पुलाच्या खाली प्लॅस्टिकच्या पिशवीत एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. मुक्ताईनगर पोलिसांनी "त्या" मृतदेहाची ओळख पटविण्याचे आव्हान केले होते. मात्र लवकर ओळख न पटल्याने पोलिसांनी तिथेच अंत्यविधी उरकला होता. मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
   
 असा झाला उलगडा

दरम्यान प्रभा फाळके यांच्या मुलाने मुक्ताईनगर पोलिसांनी पाठवलेल्या फोटोवरून तो मृतदेह आपल्या आईचाच असल्याचा दावा केला. त्यामुळे पोलिसांनी त्यादृष्टीने तपासाची चक्रे फिरवली. मुक्ताईनगर पोलीस तसेच जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने प्रकरणाच्या तपासासाठी मलकापूर गाठले. या खूनाबाबत मलकापूर शहरातील महाकाली नगर, बसस्थानक, गणपती नगर व अन्य ठिकाणी चौकशी केली.

तपासादरम्यान या प्रकरणाशी सबंधित महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी मृतक प्रभा फाळके यांच्या घराशेजारील विश्वास भास्कर गाढे(४१) व भार्गव विश्वास गाढे(२१) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांनी आधी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलीसी खाक्या दाखवताच दागिन्यांसाठी प्रभा फाळके यांचा खून केल्याची कबुली पिता पुत्रांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी बापलेकांकडून प्रभा फाळके यांच्या अंगावरील सोन्या चांदीचे दागिने , बांगड्या, २ गोफ असा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.