खळबळजनक! रमजान ईदची नमाज पठणासाठी गेलेल्या तरुणाचा चाकूने भोसकून खून; संग्रामपूर तालुक्यातील घटना

 
sddfb
संग्रामपूर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)- रमजान ईद निमित्त ईदगाह  मैदानावर नमाज पठण करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला ,आज ३मे रोजी सकाळी ९ वाजता संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथे ही घटना घडली. रमजान ईद आणि अक्षय तृतीया या धार्मिक सणाच्या दिवशीच ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज रमजान ईद निम्मित मुस्लिम समाज बांधव नमाज पठण करण्यासाठी बावनबीर येथील ईदगाह परिसरात एकत्र आले होते. यावेळी पूर्ववैमनस्यातून मुस्लिम समाजाच्या दोन गटात वाद झाले. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी उडालेल्या गोंधळात शेख रफिक शेख गणी (२७, रा. बावनबीर, ता. संग्रामपूर) या तरुणाच्या पोटात चाकूने वार करण्यात आले.

गंभीर जखमी अवस्थेत त्याला  सोनाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुट्टे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. याप्रकरणी पोलिसांनी संशयीत म्हणून ५ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे बावनबीर परिसराला सध्या पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असून तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.