खळबळजनक! बोलेरो गाडीने चिरडून शेतकऱ्याचा खून; देऊळगावराजा तालुक्यातील सुलतानपुरची घटना! अवैध रेतीचा ट्रक शेतातून नेण्यास मनाई केल्याने घडले कांड?

 
jhhj
देऊळगाव राजा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ट्रक शेतातून नेण्यास मनाई केल्याचा राग मनात धरून शेतकऱ्याचा बोलेरो ने चिरडून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. देऊळगावराजा तालुक्यातील सुलतानपुरात काल, ५ डिसेंबरच्या रात्री ही घटना घडली. आज,६ डिसेंबरला याप्रकरणी तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.  तेजराव गोविंदराव डोईफोडे (६०, रा . सुलतानपुर) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
   

प्राप्त माहितीनुसार  सुलतानपुर येथीलच  रंगनाथ पुंजांजी डोईफोडे व त्यांची मुले शिवाजी रंगनाथ डोईफोडे, नरेश रंगनाथ डोईफोडे या तिघा बापलेकांना  मृतक  तेजराव डोईफोडे व त्यांच्या मुलाने शेतातून ट्रक नेण्यास मनाई केली होती. याचा राग मनात धरून   रंगनाथ डोईफोडे व त्यांच्या दोन मुलांनी तेजराव डोईफोडे व त्यांच्या मुलाला लोखंडी टॉमीने व काठीने मारहाण केली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर तेजराव डोईफोडे  यांच्या घराबाहेर येऊन त्यांना शिवीगाळ केली. आरोपींनी त्यांच्या ताब्यातील बोलेरोने तेजराव डोईफोडे यांना चिरडल्याने त्यांचा मृत्यू झाला.या प्रकरणानंतर आरोपी स्वतःहून देऊळगावराजा पोलीस ठाण्यात पोहचले. पोलिसांनी याप्रकरणी तिघा  बापलेकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
    
अवैध रेती वाहतुकीची किनार..?

 दरम्यान जो ट्रक शेतातून नेण्यास मृतक तेजराव डोईफोडे यांनी मनाई केली होती,त्या ट्रक मध्ये अवैध रेती  होती अशी चर्चा आहे. आरोपींचा अवैध रेती वाहतुकीचा व्यवसाय असल्याचे बोलल्या जात आहे. सुलतानपूर, इसरुळ, मंडपगाव या परिसरात अवैध रेतीचा धुमाकूळ आहे, मात्र असे असले तरी महसूल आणि पोलिस मात्र मूग गिळून गप्प असल्याची चर्चा आहे. प्रशासनाच्या या बिनधास्तपणामुळेच रेतीमाफियांची हिम्मत वाढली असून सुलतानपूर प्रकरण त्याचीच परिणीती असल्याचे बोलल्या जात आहे.