लाच घेतांना उपजिल्हाधिकारी पकडला तरी खादाडांना अक्कल येईना! देऊळगाव राजात अव्वल कारकुन एसीबीच्या जाळ्यात!निवडणूक प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले ५ हजार

 
lach
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  गत वर्षात ८ लाचखोरांवर कारवाई झाली. मात्र लालूच काही सुटत नाही. निवडणुक खर्चाचे प्रमाण पत्र देण्यासाठी ५ हजार रुपयाची लाच स्विकारतांना देऊळगावराजा तहसिल कार्यालयातील अव्वल कारकुन रामेश्वर कऱ्हाळे याला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली. ही कारवाई आज ९ जानेवारी रोजी करण्यात आली. या कारवाईमुळे महसुल कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

देऊळगावराजा तालुक्यातील गोळेगाव येथील तक्रारदार यांनी डिसेंबर २०२२ मधे झालेल्या गोळेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत शेतकरी ग्रामविकास पॅनलच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. प्रत्येक उमेदवारास विहीत मुदतीत निवडणूक खर्चाचा तपशील निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे सादर करणे बंधनकारक असल्याने, तक्रारदाराने ४ जानेवारी रोजी त्यांच्या पॅनलच्या एकूण ८ उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा तपशील अव्वल कारकून रामेश्वर कऱ्हाळे यांच्याकडे सादर केला. परंतु अव्वल कारकुन  कऱ्हाळे यांनी तक्रारदारास पॅनल मधील उर्वरित २ उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा तपशील घेऊन येतांना प्रती उमेदवार ५०० रुपये याप्रमाणे एकूण दहा उमेदवारांचे पाच हजार रुपये घेऊन या, त्यानंतर तुम्हाला निवडणूक खर्चाचे प्रमाणपत्र देतो, असे सांगितले.

त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठुन तक्रार दाखल केली. आज ९ जानेवारी रोजी पंचासमक्ष या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर एसिबीच्या पथकाने तहसिल कार्यालयात सापळा रचला. यावेळी तक्रारदाराकडून ५ हजार रुपयाची लाच स्विकारतांना अव्वल कारकुन रामेश्वर रुस्तुम   कऱ्हाळे यास पथकाने अटक केली. ही कारवाई एसीबीचे पोलीस उपअधिक्षक संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विलास साखरे, राजु क्षिरसागर, अतरोद्दीन काझी, चालक नितीन शेटे यांनी केली आहे.

गतवर्षातील लाचखोर

महसूल विभाग २, विधी व न्यायालय विभाग १, जिल्हा परिषद २, भुमिअभिलेख १, वनविभाग १, शिक्षण विभाग १ अशा ८ लाचखोरांवर कारवाई झाली.

वर्षनिहाय लाचखोर 

वर्ष २०१७-१७, वर्ष २०१८-२०, वर्ष २०१९-१७, वर्ष २०२० मध्ये १४, वर्ष २०२१-१५, वर्ष २०२२-०८ असे लाचखोर पकडले.