दोन आठवडे उलटले तरीही "ममता" ची ओळख पटेना अन् मारेकऱ्यांचा शोधही लागेना! शिर्ला नेमानेच्या नदीत गळा आवळून फेकले होते! पोलिसांचा तपास खरचं सुरुय का?

 
jhfy
खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अनोळखी महिलेचे प्रेत दोन आठवड्याआधी शिर्ला नेमानेच्या नदीपात्रात सापडले होते. उत्तरीय तपासणीच्या अहवालात महिलेचा गळा आवळून खून केल्याचे समोर आले होते. मात्र दोन आठवडे उलटले तरीही ती महिला कोण अन तिचे मारेकरी कोण याचा तपास मात्र पोलिसांना लावता आलेला नाही.

 शिर्ला नेमाने येथील मन नदीपात्रात २२ नोव्हेंबर ला महिलेचे प्रेत आढळले होते. हिवरखेड पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यात महिलेच्या हातावर "ममता" असे गोंदलेले  आढळले होते. तर डाव्या तळहातावर पेनाने आशिष, आशिष असे अनेकदा लिहिलेले होते. उत्तरीय तपासणीदरम्यान महिलेचा गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली तर मारेकऱ्यांचा सुगावा लागेल या उद्देशाने पोलिसांनी ओळख पटविण्याचे आवाहन केले खरे मात्र २ आठवडे उलटले तरी पोलिसांना त्यात यश आलेले नाही. त्यामुळे पोलिसांचा तपास कोणत्या दिशेने सुरू आहे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. महिलेच्या हातावर गोंदलेले "ममता" हे नाव कुणाचे? पेनाने तळहातावर उल्लेख असलेला आशिष कोण याबद्दलची माहिती मिळविण्यात पोलिसांना अपयश येत आहे. पोलिसांकडून तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत असले तरी २ आठवडे उलटल्याने तपास खरचं सुरुय का अशी कुजबुज परिसरात सुरू आहे.