अतिवृष्टीने होत्याचे नव्हते झाले; हातातोंडाशी आलेला घास हिरावला;लोक पैशासाठी मारायचे चकरा! कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; खामगाव तालुक्यातील हृदयद्रावक घटना

 
kujb
खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): यंदा परतीचा पाऊस आभाळ फाटल्यासारखा बरसतोय. जिल्हाभरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. खामगाव तालुक्यातील शिर्ला नेमाने येथे अतिवृष्टीने तरुण शेतकऱ्याचा बळी गेलाय. शेतात उभे असलेले सोयाबीन पाण्याखाली दबले, काही सडले, पावसामुळे सोंगताही येईना अशी अवस्था झाल्याने तसेच कर्जाचा डोंगर सातत्याने वाढत असल्याने तरुण शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. वैभव गजानन गायकवाड(२५) असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.

वैभवच्या नावावर ४ एकर शेती आहे. त्याच्यावर व कुटुंबावर निशांत बँकेचे, स्टेट बँकेचे व काही खाजगी असे ६ ते ७ लाख रुपयांचे कर्ज होते. दरम्यान यंदा शेतात सोयाबीन पेरले होते. पीक काढल्यानंतर काही खाजगी लोकांचे कर्ज फेडायचे वैभवने ठरवले होते. मात्र ऐन सोयाबीन सोंगायच्या वेळेला पावसाने धुमाकूळ घातला. सोयाबीनच्या शेतात पाणी तुंबले, काही सोयाबीन उभ्याने सडली त्यामुळे उत्पन्नात मोठी घट होणार असल्याचा अंदाज वैभवला आला होता. याशिवाय ज्या काही खाजगी लोकांचे कर्ज होते ते सातत्याने पैशासाठी चकरा मारत असल्याने वैभवला अपमानास्पद वाटत होते. आता करावे तरी, कर्ज कसे फेडावे या विवंचनेत तो होता. 

 १७ ऑक्टोबरला सकाळी साडेनऊला तो शेतात जातो म्हणून घरून निघाला. दरम्यान त्यानंतर कुटुंबीय शेतात गेले असता शेतातील विहीरीत वैभवच्या चपला दिसल्या. वैभव अन्य कुठेच दिसत नसल्याने त्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे लक्षात आल्यानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. हिवरखेड पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वैभवच्या पश्यात आई, वडील,भाऊ आणि वहिनी असा परिवार आहे.