बायकोच्या चारित्र्यावर संशय; रोज बायकोला म्हणायचा, "सांग हा मुलगा कुणाचा?" बायकोला बेदम मारले! चिखली शहरातील घटना!

 
kraim
चिखली ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  बायकोच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या संशयी नवऱ्याने बायकोला बेदम मारहाण केली. तिला घराबाहेर हाकलले. तिला झालेले ४ महिन्याचे बाळ माझे नाहीच असा कांगावा या संशयी नवरोबाने केला. अखेर बायकोची सहनशीलता संपल्याने तिने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी विवाहितेच्या नवऱ्यासह ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चिखली शहरातील सैलानी नगरात हा प्रकार समोर आलाय.

चिखलीच्या सैलानीनगरात राहणाऱ्या २७ वर्षीय विवाहितेने याप्रकरणाची तक्रार दिली. तिचा नवरा तिच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान असून बांधकाम ठेकेदार आहे.गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात त्यांचे लग्न झाले होते. लग्नानंतर केवळ ४ ते ५ महिने तिला नवऱ्याने व सासरच्या लोकांनी चांगले वागवले. नंतर दारुडा नवरा रात्री उशिरा येवून तिला बेदम चोप द्यायचा. सेंटरिंग करण्यासाठी माहेर वरून २ लाख घेऊन ये असा तगादा नवऱ्याने तिच्याभोवती लावला. पैशाची व्यवस्था केली नाही मी दुसरे लग्न करीन तुला तलाक देऊन असे नवरा म्हणत होता. ती गर्भवती असताना तिला उपाशी ठेवण्यात येत होते असे तिने तक्रारीत म्हटले आहे. 

 दरम्यान विवाहितेला मुलगा झाल्यावर तिच्या नवऱ्याची आक्रमकता प्रचंड वाढली. हा मुलगा माझा नाहीच असे तो म्हणत होता व सतत बायकोला "सांग कुणाचा मुलगा आहे?" असे विचारत बेदम मारहाण करीत होता . ५ जानेवारी २०२२ रोजी तिच्या नवऱ्याने तिला बेदम मारहाण केली व घरातून हाकलून लावले. तेव्हापासून बिचारी माहेरी बापाच्या दयेवर जगत आहेत. मध्यस्थी मंडळींनी बऱ्याचदा बैठक बसवून समझोता करण्याचा प्रयत्न केला मात्र समजोता झाला नाही. अखेर कंटाळून तिने १६ जून रोजी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी विवाहितेचा नवरा, सासू, सासरे, आजनसासू, दिर, जाऊ , नणंद अशा ९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.