धुऱ्याचा वाद विकोपाला गेला अन् आणखी एकाचा जीव गेला..! धाड हादरले! जिल्ह्यात धुऱ्याच्या वादावरून १० दिवसांत २ खून!

प्राप्त माहितीनुसार धाड जवळील जनुना शिवारात अमोल शिवाजी पवार(३०) आणि दादाराव दगडु सरदार(७०) यांची शेती शेजारी शेजारी आहे. २९ जून रोजी दोघेही आपापल्या शेतात काम करीत होते. त्यावेळी धुऱ्यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. वाद एवढा विकोपाला पोहचला की त्यावरून हाणामारी झाली. या मारहाणीत अमोल पवार याने दादाराव सरदार यांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले.
त्यांना उपचारासाठी आधी ग्रामीण रुग्णालयात व नंतर औरंगाबाद येथे हलविण्यात आले. दरम्यान ७ जुलै रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या मृतकाच्या नातेवाईकांनी मृतदेह धाड पोलीस ठाण्यात आणून ठिय्या मांडला. जोपर्यंत खुनाचा गुन्हा दाखल होऊन आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने पोलिसांनी तातडीने पावले उचलत आरोपी अमोल पवार विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुढील तपास धाड पोलीस करीत आहेत.