सरपंचाने सही दिली नाही म्हणून ग्रामपंचायतीत ठेकेदाराचा राडा!कागदपत्रे फाडली, टेबलाला मारली लाथ, फुटला काच! देऊळगाव साकर्शा येथील घटना

 
sdfg
मेहकर (अनिल मंजुळकर: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सरपंचाने सही दिली नाही म्हणून ग्रामपंचायतीत ठेकेदाराने राडा केला. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मारहाण केली. ही  घटना मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकर्शा ग्रामपंचायतीत काल, ६ मे रोजी दुपारी घडली. याप्रकरणी जानेफळ पोलीस ठाण्यात ग्रामसेवकाने दिलेल्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देऊळगाव साकर्शा येथील बांधकाम ठेकेदार  हर्षल प्रेमचंद नहार यांच्या ई निविदा कागदपत्रांवर सरपंचाने सही दिली नाही म्हणून ग्रामपंचायत कर्मचारी भिकाजी गायकवाड व नितीन आल्हाट यांना शिवीगाळ केली. यावेळी ग्रामसेवक राम शेळके यांनी भांडण करू नका असे म्हटले असता हर्षल नहारने ग्रामसेवकाच्या  टेबलवरील शासकीय कागदपत्रे फाडली व धक्काबुक्की करून टेबलाला लाथ मारली. ग्रामपंचायत कर्मचारी नितीन आल्हाट यांच्या पोटात व छातीत लाथाबुक्क्या हाणल्या.

त्याचे भाऊ हितेश नहार व रितेश नहार यांनी ग्रामपंचायत कार्यालयात गोंधळ घातला व कार्यालयावर दगडफेक केली असे ग्रामसेवक  राम प्रकाश शेळके यांनी जानेफळ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलीसांनी ठेकेदार हर्षल नहार, हितेश नहार व रितेश नहार विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास ठाणेदार राहुल गोंधे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार प्रल्हाद टकले व विनोद फुफाटे करीत आहेत.