अल्पवयीन मुलीचा एका झटक्यात लावला बालविवाह! मोबाईलवर मंगलाअष्टक लावून मुलीला नवऱ्याच्या ताब्यात दिले! मध्यप्रदेशातील नवऱ्याच्या घरून पळून येत तिने गाठले पोलीस ठाणे! खामगावची घटना

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खामगाव शहरातील अकोला बायपास वरील मोठ्या हनुमान मंदिराजवळ राहणाऱ्या सोनलने( नाव बदलले आहे) या प्रकरणाची तक्रार दिली आहे. सोनल सध्या दहाव्या वर्गात शिकते. संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे तिचे मामा राहतात. २५ जुलै रोजी ती तिच्या आईवडीलांसह मामाच्या घरी गेली होती. दरम्यान त्याच दिवशी मामाच्या घरी दोन तीन महिला व पुरुष असे पाहुणे आले. पाहुण्यांसोबत आलेल्या मुलासोबत तुझे लग्न लावायचे आहे असे सोनल च्या आईवडिलांनी सांगितल्यावर तिला प्रचंड धक्का बसला. तिने नकार दिला मात्र आई वडिलांनी धमकावल्याने तिने तयारी केली. मोबाईल मध्ये मंगलाष्टक लावून आणि गळ्यात हार घालून तिचे त्याच दिवशी लग्न लावून देण्यात आले.
दरम्यान लग्नानंतर तिला मध्यप्रदेशातील उमरिया या गावी नेण्यात आले. कुणाला काही सांगितल्यास तुला जीवाने मारून टाकू अशी धमकी तिचा नवरा रोहित कावरे व सासू सासरे देत होते. तिथे तिला मारहाण करण्यात येत होती. त्यातच त्यांची नजर चुकवून ऑटो,बस व मिळेल त्या वाहनाने तिने खामगाव गाठले. काल, १५ सप्टेंबर रोजी तिने तिच्या आत्याला सोबत घेऊन खामगाव शहर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी सोनल च्या आईवडिलांसह तिच्याशी लग्न करणाऱ्या रोहित कावरे (२५) व सासू सासरे अशा ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.