फसवणुकीचा भरदिवसा खेळ चाले! पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने १ लाख ११ हजाराचे दागिने लंपास; महिलांनो जरा सावध व्हा; भामटे कशी शक्कल लढवतात ते वाचाच...

 
hyg
लोणार(प्रेम सिंगी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात दिवसागणिक फसवणुकीचे प्रकार समोर येत असून,भामटेगिरीला उधाण आल्याचे दिसते. माऊली नगर, लोणार येथे भांड्यांना पॉलिश देण्याच्या बहाण्याने १ लाख ११ हजार रुपये किमतीचे एका महिलेच्या गळ्यातील ३ तोळे सोन्याचे गंठण व पेंडॉल २ अज्ञात आरोपी लंपास करून पसार झाले आहेत. ही घटना काल, २७ डिसेंबरला दिवसा ११ वाजता घडली.

लोणार येथे माऊली नगरातील सौ. सुचिता हेमंत इंगोले या गृहिणींने लोणार पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे.२७ डिसेंबरला त्यांचे पती सोलर पंप बदलून देण्याकरिता मेहकर येथे गेले होते. घरात एकटी असताना, घराबाहेर २ अनोळखी व्यक्ती आले. त्यांनी तांबे-पितळीची भांडी पॉलिश करून देतो म्हणून सांगितले.भांडी पॉलिश करून दिल्यावर त्यांनी सोन्याचे दागिने असतील तर दागिनेही पॉलिश करून देतो म्हणाले. त्यांना महिलेने गळ्यातील ३ तोळे पेंडोलसह सोन्याचे गंठण पॉलिशसाठी दिले. दरम्यान त्यांनी गरम पाण्याची मागणी केली. गॅसवर पाणी गरम करायला ठेवले असताना सदर दोन्ही अनोळखी इसम दुचाकीवर पळून जाताना महिलेच्या निदर्शनास आले. महिलेने आरडाओरडा केल्यावर शेजाऱ्यांनी शोधा शोध केली पण आरोपी पसार झाले होते, अशी तक्रार पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली. याप्रकरणी आरोपी विरोधात ४२०,३७९ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांची जनजागृती निरुपयोगी...

 बुलडाणा जिल्हा पोलीस दलातर्फे महिलांची सोनसाखळी तोडणाऱ्यांची पद्धत, पॉलिशच्या भाड्याने दागिने मागणाऱ्या गुन्हेगारांबाबत वारंवार बॅनर, समाज माध्यमावर जनजागृती करण्यात येते. तरीसुद्धा फसवणुकीचे प्रकार समोर येत असल्याने गुन्हा घडल्यावर डोळे उघडल्याचा प्रत्यय येतो.

महिलांनो सावध व्हा..!

   जिल्ह्यात अशा फसवणुकीच्या घटना अनेक वेळा समोर आल्या. महिला घरात एकटे असल्याचा अंदाज घेऊन किंवा पालक ठेवून घरात काही कारणाने प्रवेश मिळवला जातो आणि हात चला की नि दागिने लांब पास केले जातात. लोणार येथे घडलेल्या या घटने पुन्हा एकदा महिलावर्गांनी घरी एकटे असताना सावध राहणे आवश्यक आहे, हे अधोरेखित होते. विशेष करून महिलांनी अंगावरील दागिने महागाईच्या वस्तू विषयी अज्ञात व्यक्तीला माहिती देऊ नये. कोणत्याही कारणाने चीज वस्तू कोणाच्या ताब्यात देऊ नये किंवा अनोळखी लोकांना घरात प्रवेश देखील देऊ नये.