चाणक्य ट्रॅव्हल्सने दुचाकीला चिरडले; निमखेडच्या पोलीस पाटलांची पत्नी जागीच ठार! मोताळा तालुक्यातील घटना

 
accident
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चाणक्य ट्रव्हल्सने बुलडाण्यावरून  मोताळ्याकडे जाणाऱ्या दुचाकीला खडकी  फाटयाजवळ चिरडले. या अपघातात मोताळा तालुक्यातील निमखेडचे पोलीस पाटील  प्रेमसिंग राठोड यांची पत्नी सौ.शितल राठोड हया जागीच ठार झाल्या तर प्रेमसिंग राठोड गंभीर जखमी झाले. काल, ४ मे रोजी रात्री साडेआठच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.  ट्रॅव्हल्सचालक  घटनास्थळावरुन भरधाव वेगाने बुलडाणाकडे पसार झाला.  मात्र बुलडाणा शहर पोलिसांनी चालकाला ताब्यात घेवून ट्रॅव्हल्स पोलीस ठाण्यात जमा केली.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माहितीनुसार मोताळा तालुक्यातील निमखेड येथील पोलिस पाटील प्रेमसिंग राठोड पत्नी सौ.शितल राठोड यांच्यासह दुचाकीने  बुलडाण्यावरून ४ ने रोजी रात्री ८ वाजेच्या दरम्यान घराकडे जात होते. दरम्यान  खडकी फाटयावर मलकापूरवरुन पुण्याकडे जाणाऱ्या चाणक्य ट्रॅव्हल्सच्या बसने जबर धडक दिली.

अपघात एवढा  भिषण होती की, यामध्ये  शितल राठोड यांच्या मेंदूचा चेंदामेदा होवून त्या जागीच ठार झाल्या.  अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रॅव्हल्स चालकाने त्यांना कोणतीही  मदत न करता ट्रॅव्हल्स  घेवून बुलडाण्याकडे पसार झाला होता.  घटनेची माहिती मिळताच बुलडाणा शहर पोलिसांनी ट्रॅव्हल्स चालकाला ताब्यात घेवून ट्रॅव्हल्स पोलीस ठाण्यात जमा केली. अपघातात जखमी झालेले प्रेमसिंग राठोड यांच्यावर बुलडाणा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनास्थळ बोराखेडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याने अपघाताचा तपास बोराखेडी  पोलीस करीत आहेत.