धार्मिक स्थळांवरील भोंग्याबाबत बुलडाणा जिल्हा पोलिसांचे आदेश धडकले! विनापरवाना भोंगे लावाल तर खबरदार..

 
rghkj
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)- राज्यात भोंग्यावरून राजकीय व धार्मिक वातावरण पेटल्याने पोलीसांचा ताण वाढला आहे. मशीदीवर भोंग्यातून अजान वाजली तर तुम्ही भोंग्यातून हनुमान चालीसा लावा असे वक्तव्य राज ठाकरेंनी केल्यानंतर ठिकठिकाणी मनसे आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्हा पोलिसांकडून भोंग्याबाबत आदेश पारित करण्यात आले आहे. विनापरवाना धार्मिक स्थळांवर भोंगे लावल्यास पोलीस कायदेशीर कारवाई करणार आहेत.
जिल्हा पोलीस दलाच्या गृहविभागाचे पोलीस उपअधीक्षक गिरीश ताथोड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार ज्यांनी धार्मिक  स्थळांवर लाऊडस्पीकर लावण्यासाठी परवानगी घेतलेली नाही अशांनी तात्काळ त्या त्या ठिकाणच्या ठाणेदारांकडे नियमानुसार अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. ज्यांच्याकडे परवानगी नाही अशांनी धार्मिक स्थळांवर भोंगे लावू नये, तसे केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. या विषयासंदर्भात कुणाची काही तक्रार असल्यास ११२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांनी केले आहे.